लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात भोई बांधवांच्या वतीने तब्बल पाच लाख मत्स्यबीज सोमवारी धरणात सोडले. धरण दोन वर्षानंतर पहिल्यांदाच तुडुंब भरल्याने मत्स्य उत्पादकांना याचा फायदा होणार आहे.तालुक्यात गेल्या दोन वर्षा पासून दुष्काळी परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला. जुई व धामणा धरण गेल्या ९ महिन्यापासून कोरडे पडल्यामुळे मत्स्यबीजाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या २५ कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. यावर्षी जून महिन्यामध्येच तालुक्यातील उत्तर भागातील जुई, धामणा, पद्मावती या धरणासह लहान मोठ्या पाझर तलावात मुबलक पाणी आल्याने भोई बांधवांनी धरणामध्ये मत्स्यबीज टाकण्यास सुरुवात केली आहे. मुबलक पाण्यामुळे मस्त्यव्यवसायातून चांगला फायदा होण्याची आशा परदेशी भोई समाज मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन हिरासिंग सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील सर्वच धरण, पाझर तलावामध्ये सुमारे १ कोटी मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. त्यामध्ये जुई धरणात २० लाख, धामणा धरणात २५ लाख, व पद्मावती धरणात २० लाख शिवाय बाणेगाव, व पळसखेडा दाभाडी, चांदई एक्को, रेलगाव या धरणात सुध्दा मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे. यामुळे यंदा भोई बांधवांच्या आशा उंचावल्या आहेत.
‘जुई’त सोडले पाच लाख मत्स्यबीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 1:28 AM