लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विधासभेच्या निवडणुकीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत आहे. जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत एकूण पंधरा लाख ५४ हजार ११० मतदार आहेत. शुक्रवापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून, चार आॅक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.हे अर्ज त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय कार्यालयात स्वीकारले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. या निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. २७ संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चैतन्य एस. यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.जालना जिल्ह्यात जालना, अंबड, बदनापूर, घनसावंगी आणि भोकरदन असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण पंधरा लाख ५४ हजार ११० मतदार असल्याचे बिनवडे म्हणाले. जवळपास एक हजार ६५३ मतदान केंदे्र आहेत. त्यातील २७ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात म्हणून यंत्रणा सज्ज असून, जवळपास एक हजार १८३ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून, ४०० पेक्षा अधिक गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घेतली जाईल.संवेदनशील केंद्रांवर शस्त्रधारी जवानसंवेदनशील मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांमधील शस्त्रधारी जवान तैनात करण्यात येणार असल्याचे अधीक्षक चैतन्य म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून, काही जणांना हद्दपारही केले आहे. या पत्रकार परिषदेस निवडणूक उपजिल्हाधिकारी दीपाली मोतियेळे यांच्यासह अन्य विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
पंधरा लाख मतदार निवडणार पाच आमदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:19 AM