लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतजमिनीच्या आॅनलाइन फेरफार काढण्यासाठी आॅनलाइन नोटीस काढण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच घेताना रोहनवाडी सजाचा तलाठी प्रसाद दत्तात्रय हजारे याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी सकाळी अकरा वाजता मंठा चौफुली येथे सापळा लावून रंगेहाथ पकडले.संबंधित तक्रारदाराने मुलीच्या नावे खरपुडी येथे गट.क्रमांक १८६ प्लॉट क्र. ३७ हा खरेदीखतकरुन ८ मार्च रोजी घेतला आहे. तसेच तसेच पुतन्याचे त्याच ठिकाणी यापूर्वी प्लॉट घेतलेला आहे. मुलगी आणि पुतण्याच्या नावाने फेर घेऊन आॅनलाइन सातबारा देण्याची मागणी तक्रारदाराने तलाठी हजारेकडे वीस दिवसांपूर्वी केली होती. यासाठी प्लॉटच्या रजिस्ट्रीची सर्व कागदपत्रे दिली होती. मंडळ अधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवून तो मंजूर मिळवून तुम्हाला सुधारित सातबारा देतो, यासाठी मला दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे तो म्हणाला. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ३० मार्च रोजी एसीबीकडे लेखी तक्रार केली होती. त्याच दिवशी तक्रारीची शहानिशा केली असता पाच हजार रुपये संबंधित तलाठी स्वीकारण्यास तयार झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सोमवारी सकाळी शाकुतलनगर मंठा चौफुली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून तलाठी प्रसाद हजारे याला तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले.उपअधीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चव्हाण, संतोष धायडे, ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, अनिल सानप, उत्तम देशमुख, आत्माराम डोईफोडे, संदीप लव्हारे, रमेश चव्हाण, महेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर म्हस्के, सचिन राऊत आदींनी पार पाडली.
पाच हजाराची लाच घेताना तलाठी जेरबंद...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:50 AM