लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने एकी दाखवत जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे भाजपचे मनसुबे धुळीस मिळविले. सोमवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने संख्या बळाचे गणित जुळत नसल्याचे लक्षात येताच सपशेल माघार घेतली. यामुळे नाट्यमय घडामोडी न घडता शिवसेनेचे उत्तम वानखेडे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी पुरस्कृत शिवसेनेच सदस्य असलेले महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली.गेल्या पंधरा दिवसांपासून जालना जिल्हा परिषदेतील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. भाजपह महाविकास आघाडीचे सर्व सदस्य हे सहलीवर गेले होते. हे सर्व सदस्य सोमवारी सकाळी जालन्यात पोहचेले. भाजपच्या सदस्यांचा डेरा हा जालना बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी तळ ठोकून होते. यावेळी येथे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, आ. बबनराव लोणीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ. संतोष दानवे हे व्यूहरचना करण्यात मग्न असल्याचे दिसून आले. दुपारी एक वाजेपर्यंत भाजपच्या नेत्यांनी सदस्यांना आपल्याकडे येन-केन प्रकारे वळविण्याचे अटोकाट प्रयत्न केले. परंतु नंतर संख्या बळ जुळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेत जि.प.च्या विशेष सभेस जाणेच टाळले.दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सदस्यांचा डेरा सहलीवरून आल्यावर खरपुडी येथील पार्थ सैनिकी शाळेत होता. यावेळी येथे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर, अनिरूध्द खोतकर, सतीश टोपे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे यांच्यासह माजी आ. शिवाजी चोथे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपाध्यक्ष पदासाठी पुन्हा सतीश टोपे हे इच्छुक होते. परंतु त्यांची समजूत काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्या जागेवर टोपेंचे पूर्वीपासूनचे विश्वासू सदस्य महेंद्र पवार यांना उपाध्यक्ष पद देण्याचे ठरले. तसेच अध्यक्षपदासाठी शिवसेनेने जाफराबाद तालुक्यातील उत्तम वानखेडे यांना संधी दिली. या दोघांनी नियोजित वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपाकडून एकही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दीपाली मोतीयाळे यांनी वानखेडे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी पवार यांच्या नावाची घोषणा केली.भाजपचा सभापती पदांवर डोळाजालना जिल्हा परिषदेत आज झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने माघार घेतली आहे. हे जरी खरे असले तरी, आगामी काळात होणाऱ्या जि.प.च्या विषय समितीच्या सभापती निवडीत भाजपचे दोन सभापती राहतील यावर सर्वपक्षीय एकमत झाल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान यापूर्वी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे बंधू अनिरूध्द खोतकर यांची डिनर डिप्लोमसी झाली होती. तर सोमवारी सकाळी येथील मंठा चौफुलीवर एका बियाणे कंपनीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची सकाळी अर्धातास बैठक झाल्याने या मुद्याला महत्व प्राप्त झाले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. दरम्यान ही भाजपची माघार म्हणजे लोणीकर गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच होती की, काय ? अशी चर्चा जि.प. वर्तुळात दबक्या आवाजात सुरू होती. मात्र, यावर लोणीकर गटाकडून कुठलीच प्रतिक्रिया उमटली नाही.आघाडी : पाच सदस्य अनुपस्थितजिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित सभेत २९ सदस्यच उपस्थित होते. भाजपचे सर्व सदस्य अनुपस्थित राहिले. तर पाच सदस्यही अनुपस्थित असल्याने ते नेमके कोणत्या पक्षाशी बांधील आहेत, या बद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.यात काँग्रेसच्या अरूणा सदाशिव शिंदे, राष्ट्रवादीच्या रंजना पंडित, लक्ष्मीबाई सवणे, शिवसेनेचे गोकुळ वगरे आणि अपक्ष अंशीराम कंटुले हे सदस्य गैरहजर होते.अपक्ष ठरले ‘किंगमेकर’जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता भाजपाकडे २२, सेनेकडे १४, राष्ट्रवादीकडे १३, काँग्रेसकडे ५ आणि अपक्ष २ असे एकूण ५६ सदस्य आहेत. भाजपने महाविकास आघाडीचे ४ व अपक्ष १ असे एकूण ५ सदस्य फोडले आहे. त्यामुळे भाजपला बहुमतासाठी २ तर महाविकास आघाडीला १ एका सदस्याची आवश्यकता होती. परंतु, एक अपक्ष हे महाविकास आघाडीकडून राहिल्याने महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करता आली.वानखेडेंची निवृत्तीनंतर राजकारणात एंट्रीजाफराबाद : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी जाफराबाद तालुक्यातील शिवसेनेचे वरुड बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे उत्तम वानखेडे यांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. जिल्हा परिषद स्थापनेपासून आतापर्यंत जाफराबाद तालुक्याला अध्यक्ष पद तर सोडाच उपाध्यक्ष पदही मिळाले नाही. मात्र या वेळेस अध्यक्षपद मिळाल्याने उशिरा का होईना शिवसेनेने जाफराबाद तालुक्याचा सन्मान केला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसत आहे.जाफराबाद तालुक्याला या पूर्वी समाजकल्याण सभापती, महिला व बालकल्याण सभापती, शिक्षण सभापती ही पदे देऊन खूश करण्यात येत असे, मात्र या वेळेस शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश गव्हाड यांनी शिवसेना पदाधिकारी माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर, यांचा विश्वास संपादन करून महाविकास आघाडीच्या रूपाने जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात तालुक्याला महत्वाचे स्थान मिळाले आहे.तालुक्यात पाच जि.प. सदस्य असून एकमेव अनुसूचित जाती राखीव असलेल्या गटाला हा मान मिळाला. वरुड बुद्रुक गट हा नेहमी युतीच्या ताब्यात राहिला आहे. मात्र गेल्या वेळेस वेगवेगळ्या निवडणुका झाल्या असतांना या ठिकाणी एकमेव शिवसेना सदस्य म्हणून माजी सभापती रमेश गव्हाड यांनी महसूल प्रशासनातून सेवानिवृत्त झालेल्या उत्तम वानखेडे यांच्या सारखा सर्वसामान्याला संधी देऊन अध्यक्षपदापर्यंत पोहोचविले.
महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 12:54 AM