लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दूध सकंलन वाढविण्यासाठी एरवी शेतकऱ्यांचे उंबरठे झिझविणा-या शासकीय दूध संकलन विभागाला यावेळी प्रथमच अतिरिक्त दूध संकलनाचा प्रश्न निर्माण झाल्याने हा विभाग हवालदिल झाला आहे. बुधवारी जालना येथील शासकीय दूध संकलन केंद्रावर जवळपास चाळीस हजार लिटर दूध असलेले टँकर उभे असल्याने यंत्रण हतबल झाली आहे.जालना येथील जेईएस महाविद्यालयाजवळ शासकीय दूध संकलन आणि प्रक्रिया करणारा प्लांट आहे. येथे दररोज साधारणपणे दहा ते १२ हजार लिटर दूध येते. त्यावर चिलिंगची प्रक्रिया करून हे दूध नंतर औरंगाबाद तसेच अन्य खाजगी दूध संकलन करणा-या उद्योगांना पाठविण्यात येते.बुधवारी जालना येथील या संकलन केंद्रावर अचानक दुधाची आवक वाढल्याने हे साठवावे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दूध प्रक्रिया केंद्राची साठवण क्षमता वाढविण्यासाठी मध्यंतरी दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जवळपास एक कोटी रूपयांची नवीन यंत्र सामुग्री बसविल्याने बराच प्रश्न सुटला. परंतु, आज निर्माण झालेल्या दुधाच्या प्रश्नामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यातच शासनाने पाच रूपये प्रतिलिटर दुधाचा दर वाढवून दिला असला तरी सध्या शेतकºयांच्या खात्यात काहीही हाती आलेले नाही. एकूणच या संकलनाच्या मुद्यामुळे दूध उत्पादक अडचणीत येऊ शकतो.प.महाराष्ट्रातील तांत्रिक बिघाडाचा फटकाजालन्यासह अन्य जिल्ह्यामध्येही अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न निर्माण होण्यामागे पश्चिम महाराष्ट्रातून खाजगी मोठ्या दूध उद्योगामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने त्यांनी दूध खरेदी कमी केली आहे. याचा परिणाम म्हणून हा अतिरिक्त दुधाचा प्रश्न जालन्यात निर्माण झाला आहे. परंतु, आम्ही या संदर्भात आणखी दूध उत्पादन करणा-या कंपन्यांशी संपर्क साधून असल्याची माहिती दुग्धविकास व्यवसाय विभागातील अधिका-याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
दुधाचा महापूर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 12:48 AM