जालना : तालुक्यातील पानशेंद्रा येथील शेतकरी अनेक वर्षांची परंपरा कायम राखत फूलशेती करत आहेत. येथे वर्षांतील बाराही महिने फूल शेती करण्यात येत असून, शेतकरी केवळ फुल शेती करून आपला उदरनिर्वाह भागवित आहेत. यामधून शेतकऱ्यांना वर्षांला लाखो रुपयांचे उत्पादन मिळत आहे.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शेतीचे उत्पन्न कमी झाले. परिणामी, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येत असून, शेतकरी मोठ्या प्रमाणात नगदी पिकांकडे वळत आहेत. त्यामुळे जालना शहरापासून १० किलोंमीटर अतंरावर असलेल्या पानशेंद्रा गावात अनेंक वर्षापासून फूलशेती केली जाते. येथील शेतकरी इतर पिकांबरोबरच फुलशेती करत आहे. यामुळे रोजच्या रोज शेतकऱ्यांना रोखीने पैसे मिळत आहेत.
येथे मोठ्या प्रमाणात निशी गंधा, झेंडू, शेवंती, आॅस्टर, गुलाब, बिजली, या जातीच्या फुुलांची लागवड करण्यात येते. येथील धमेंद्र मद्दलवार यांच्या शेतात त्यांच्या पंजोबापासून फूलशेती करण्यात येते. त्यामुळे त्यांच्या शेतात बाराही महिने फुले असतात. त्यांनी यावर्षी ३ एकर मध्ये निशीगंधा, झेंडू, शेवंती, आस्टर, गुलाब जातीच्या फुलांची लागवड केली आहे. यासाठी त्यांना ७० ते ८० हजार रुपये खर्च आला आहे. ते दररोज दुचाकीने फुले घेऊन शहरातील फूल बाजारामध्ये विक्री करतात. येथे त्यांच्या फुलांना ३० ते ४० रुपये भाव मिळतो. यातून सर्व खर्च जाऊन त्यांना १५०० ते २००० हजार रुपये रोज मिळतो.
येथीलच शेतकरी गणेश पाचरणे हे गेल्या १० वर्षापासून फूलशेती करतात. त्यांनी या वर्षी ३ एकरमध्ये फुलांची लागवड केली आहे. यात शेवंती, झेंडू, बिजली या जातीच्या फुलांची लागवड केली आहे. त्यांनाही यासाठी ७० ते ८० हजार रुपये खर्च आला. ते दररोज आपल्या सायकलने शहरातील बाजारामध्ये फुले आणतात. त्यांच्याही फुलांना चांगला भाव मिळतो. परंतु, कधी फुले फेकण्याचीही वेळ येते, असे त्यांनी सांगितले. या परिसरातील जवळपास सर्वच शेतकरी फूलशेती करत आहे. यांच्या फूलशेतीमुळे इतर गावातील शेतकरीही फूलशेतीकडे वळत आहे.या हमखास उत्पन्न देणाऱ्या शेतीमुळे शेतकरी समृध्द झाला आहे.
पाण्यासाठी ठिंबकचा वापरया फुलांना ठिंबक सिंचनाने पाणी देण्यात येते. पावसाळ््यात निसर्गांची सात असते. त्यामुळे आता कमी प्रमाणात पाणी लागते. परंतु, उन्हाळ््यात व हिवाळ््यात मोठ्या प्रमाणात फुलांना पाणी लागत असल्यामुळे ठिंबकचा वापर करण्यात येतो.
पूर्ण पैसे वसूल होतात माझे पणजोबा, आजोबा फूल शेती करत होते. त्यानंतर आम्हीही परपंरा कायम राखत १२ महिने फूलशेती करत आहे. यासाठी सुरुवातीला खर्च जास्त लागतो. परंतु नंतर पूर्ण पैसे वसूल होतात. मी दररोज शहरातील मॉर्कटमध्ये फुले विकतो. मला यातून सर्व खर्च जाऊन १५०० ते २००० रुपये मिळतात.- धमेंद्र मद्दलवार शेतकरी
चांगला नफा मिळतो मी गेल्या दहा वर्षांपासून फूलशेती करीत आहे. मला याच्यातून चांगला नफा मिळत असून, यामुळे माझा दररोजाचा खर्च निघून, पैसे मागे पडत आहे. मागील सहा वर्षांपासून सायकलवरच फुले शहरातील बाजारा मध्ये घेऊन जात आहे. - गणेश पाचरणे, शेतकरी
तीन एकरमध्ये लागवड मी या शेतकऱ्यांचे पाहुण फुल शेतीकडे वळालो आहे. माझी शेती येथून दूर आहे. मी यांचे पाहुण यावर्षी जवळपास तीन एकरमध्ये फुलांची लागवड केली आहे. त्यामुळे यावर्षी किती उत्पादन निघते हे कळेल.- भगवान नवगिरे, शेतकरी