वडीगोद्री ( जालना) : शंभर-दीडशे लोकांसाठी माझ्या सहा कोटी समाजाचे नुकसान करणार नाही. आपण शंभर लोक एकत्र आलो, म्हणजे सगळे होते तसे जमत नाही. कुठलाही निर्णय घेऊन माझ्या समाजाचे मी नुकसान करणार नाही, असे सूचक वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले आहे. सोमवारी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधला.
मराठा, मुस्लिम, दलित एकत्र यायला पाहिजे, यामुळे राज्यात शंभर टक्के परिवर्तन होऊ शकते, त्यासाठी समीकरण जुळणे अत्यंत आवश्यक आहे. समीकरण जुळवणे सुरू आहे. एका जातीवर निवडणूक लढवल्या जात नसल्याचे मनोज जरांगे म्हणाले.
सध्या कोणालाच पाठिंबा नाही३० तारखेला बैठक घेणार आहे. यात दलित, मुस्लिम, मराठा काय निर्णय निघतो, हे बघणे महत्त्वाचे आहे. निर्णय ३० ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबरला होईल, असे जरांगे म्हणाले. राज्यात आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. जालना जिल्ह्याचा निर्णय झाला होता, एकपण फॉर्म भरायचा नाही, आता सांगितले आहे सर्वांनी फॉर्म भरावे, असे मनोज जरांगे म्हणाले.
आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचेमनोज जरांगे यांनी मुस्लिम धर्मगुरूंची नुकतीच भेट घेतली होती. यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. याविषयी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, नवाब शरीफच्या मुलीच्या लग्नाला मोदीसाहेब नुकती खायला गेले होते का?, तुम्ही दर्गात जाता तुम्हाला जमते, आम्ही गेले की जमत नाही. मराठा, मुस्लिम, दलित या तीन समाजांच्या नादी लागायचे नाही. आमचे हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.