जालना : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जिल्हाभरात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर सोमवारी थाळीनाद करत मागण्यांकडे लक्ष वेधले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कोणी भारूड तर कोणी पेन्शनचा पाळणा सादर केला.
जिल्ह्यात जुनी पेन्शनसह इतरही प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना १४ मार्चपासून संपावर गेल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शनिवार व रविवार सार्वजिनक सुटी असतानाही काही संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. याशिवाय सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. त्यांनी मागण्यांसदर्भात घोषणा देत सोबत आणलेल्या थाळ्या वाजवल्या. त्यामुळे या परिसरात या थाळ्यांचा नाद चांगलाच घुमत होता. अंबादास गायकवाड यांनी पोतराज व भारूड, राहुल डासाळकर यांनी पेन्शनचा पाळणा, अलका धांडे, कविता इंगळे, आरती वडगावकर यांनी भारूड सादर केले, तर स्वाती भामरे यांनी स्मृतिगीत गायले. सर्व संघटनांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून संपकऱ्यांना देण्यात आलेल्या नोटिसांची होळी केली. या संपाला विविध संघटनांसह अनेक ग्रामपंचायती पाठिंबा देत आहे.