- अशोक डोरलेअंबड : तालुक्यातील रोहिलागड येथील एका शेतातील ४० फुट खोल विहीरीत पडलेल्या बिबट्याची तब्बल चार तासानंतर सुटका झाली. वनविभागाची रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या मदतीने सोमवारी रात्री १० वाजेदरम्यान बिबट्याला सुखरूप बाहेर काढले.
रोहिलागड येथील शेतकरी हरिश्चंद्र ढोले हे रविवारपासून बेपत्ता असलेल्या वासराचा शेतशिवारात शोध घेत होते. सोमवारी सायंकाळी सहा वाजता शेतातून घरी परत जाताना रत्यातील गट नंबर ६२६ मधील शेतातील विहिरीतून आवाज येत असल्याने ढोले तिकडे गेले. यावेळी त्यांना विहीरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले.त्यांनी याची माहिती ग्रामस्थांना दिली. तसेच माहिती मिळताच बिबट्याच्या सुटकेसाठी वन विभागाच्या पथकाने शेतात धाव घेतली.
तब्बल ४० फुट खोल विहिरी अडकलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे पथक आणि ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. अखेर चार तासानंतर बिबट्या सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. शिकार करताना एक बिबट्या शेतातील विहिरीत पडला असल्याचा अंदाज आहे. बिबट्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने यावेळी दिली.