संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हर फिक्र को मै.. धुवे में उडाता चला गया.. बरबादियोंका जश्न मनाता चला गया.. हे देव आनंद यांचे ‘हम दोनो’ या चित्रपटातील गाण्यांच्या ओळी प्रमाणे जालनेकर आपले जीवन जगतात असे म्हटल्यास नवल वाटू नये. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ या म्हणी प्रमाणे जिल्ह्यातील समस्या रोज एक आव्हान उभे करतात.जालना जिल्हा होऊन ३८ वर्षे झाली आहेत. परंतु जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जालना शहराची अवस्था दयनीय आहे. तर अन्य गावे आणि शहरांचा विचार न केलेलाच बरा! येथे कोणीच कोणा विषयी स्पष्टता बाळगत नाही. सर्वजण एकमेकांची तोंडावर स्तुती करून वेळ मारून नेण्याची परंपरा रूजली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या नावाने होळी निमित्त बोंब आणि एरवी बोटे मोडायची अशी येथील नागरिकांची मानसिकता आहे. त्यामुळे नेते आणि लोकप्रतिनिधींनाही निवडणुका कशा जिंकायच्या याचे गणित सुटलेले आहे. आता तुम्ही म्हणाला एवढे सर्व लिहिण्याची गरज काय. परंतु आज ‘बुरा न मानो होली है... !’‘जालना सोने का पालना’ हे बिरूद घेऊन जगणारे आम्ही जालनेकर मात्र, दररोज कसे जीवन जगातत हे येथे महिनाभर राहिल्यावरच कळते. हा दोष एकट्या राजकारण्यांना देऊन चालणार नाही. त्यासाठी संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटले आहे, की ठेविले अनंत तैसेची राहावे... चित्ती असू द्यावे समाधान...यानुसार जालन्यातील नागरिक पंधरा दिवस पाणी नसले तरी मोर्चा काढत नाहीत. विजेचा लपंडाव हा नित्याचाचच असतो. धूळ पाचवीलाच पूजलेली आहे. अतिक्रमण, वाहतूक कोंडी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अपडाऊन, विकास कामांच्या दर्जाचे वाजलेले तीन-तेरा अशी एक ना अनेक प्रश्न घेऊन आलेला दिवस जालनेकर सुखात घालातात.संत तुकाराम महाराजांनी ठेवीले अनंत तैसैची राहावे हा अभंग मानवी जीवनात ज्या इच्छा, आकांक्षा आणि तुलनेचे वादळ उठलेले असते. ते शांत करण्यासाठीचा मथितार्थ त्यात ठासून भरला आहे. परंतु आज आपण सर्व आपल्या सोयीनुसार अर्थ काढत असतो. तसाच याही अभंगाचा अर्थ जालनेकरांनी काढला आहे. कुठल्याच बाबतीत भूमिका न घेता, त्यातून मार्ग काढत राहण्यालाच पसंती देऊन, इतरांच्या नावे बोटे मोडण्या पेक्षा या वृत्तीला होळीत आहुती देणे हाच यावर जालीम इलाज आहे.दादागिरीला लगाम..सलग पाच वेळा खासदार, सरपंच ते देशाचे मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि तेही सत्तेच्या काळात. त्यामुळे रावसाहेब दानवे अर्थात दादा जे म्हणतील ती पूर्वदिशा होती. परंतु या - ना त्या कारणाने राज्यातील सत्ता गेली. त्यांचे प्रदेशाध्यक्षपदही संपुष्टात आले. त्यामुळे त्यांचा शब्द पूर्वीप्रमाणे प्रमाण मानला जाणार नाही, ही आता वस्तुस्थिती आहे.जाने कहाँ गये वो दिन...मराठवाड्यातील उमदे नेतृत्व मातोश्रीच्या जवळचे अर्जुन खोतकर हे एकेकाळी जालनेकरांच्या गळ्यातील ताईत होते. परंतु सर्वच दिवस सारखे नसतात. हेही तेवढचे खरे, गेल्या वर्षी याच काळात थेट खा. दानवेंच्या विरोधात दोन हात करण्याची डरकाळी फोडून त्यांनी राजकीय रंग वेगळे दिसतील असा पवित्रा घेतला होता. परंतु आज हे चित्र बदलले आहे. त्यांचा गोरंट्याल यांनी पराभव केल्याने तो त्यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे ते आता जाने कहाँ गये वो दिन... हा विचार तर करत नसतील ना...?पाणी झाले बेरंग...अवघ्या महाराष्ट्राला बबनराव लोणीकर यांनी वॉटरग्रीडची योजना आणून तिचा शुभारंभही केला होता. परंतु हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट सत्तेच्या हुलकावणीमुळे मागे पडला आहे. या अर्थसंकल्पात सरकारने केवळ २०० कोटी रूपयांची तरतूद केल्याने एक प्रकारे या याजेनेवरच पाणी फेरले आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर यांचे पाणी बेरंग झाले आहे.कब आयेंगे अच्छे दिन..?दोनवेळस नगराध्यक्ष राहिलेले आणि एकदा विधानसभा लढलेल्या शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळख असलेल्या भास्कर अंबेकर यांना मात्र, पाहिजे तशी संधी मिळाली नाही. जी संधी मिळाली ती लढण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही. त्यातच गोदावरी खोºयाचे उपाध्यक्षपद मिळाल्याने दिलासा मिळाला होता. परंतु तोही सरकारने हिरावला असून, ही संधी त्यांना पुन्हा मिळणार आहे. परंतु ती केव्हां हे सांगणे कठीण.. त्यामुळे कब आयेंगे मेरे अच्छे दिन...ही प्रतीक्षा अंबेकर करताना दिसतात.अच्छे दिन..आ गये....२०१४ च्या निवडणुकीत अवघ्या २९६ मतांनी पराभव स्वीकारावा लागल्याने हताश झालेल्या काँग्रेच्या कैलास गोरंट्याल यांना २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी भरभरून दान दिले. आणि ते पुन्हा जालन्याचे आमदार झाले. त्यातच त्यांना जर मंत्रीपद मिळाले असते, तर दुधात साखर. परंतु ते यामुळे नाराज नाहीत. अब फिरसे मेरे अच्छे दिन आ गये..या त्यांच्या खास शैलीत ते उत्साहाने काम करताना दिसतात.जो जिता वही सिकंदर..राजेश टोपे यांचा घनसावंगी हा परंपरागत गड राहिला आहे. त्यांचे वडिल स्व. अंकुशराव टोपे यांनी राजेश टोपे यांना संपूर्ण राजकीय, शैक्षणिक आणि सहकाराचे मैदान सजवून दिले आहे. आता त्यांना त्याची केवळ निगा राखून त्यात वाढ करायाची आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या डॉ. हिकमत उढाण यांनी गड जिंकत आणला होता, परंतु जो जीता वही सिकंदर या उक्ती प्रमाणे टोपेंनीच बाजी मारली. केवळ बाजी मारूनच ते थांबले नाहीत, त्यांना कॅबिनेटमंत्री पदाची संधीही मिळाली.अब कहॉँ जाओंगे....?युवा नेतृत्व म्हणून राजेश राऊत यांच्याकडे गेल्या २० वर्षापासून पाहिले जाते. परंतु त्यांचा राजकीय प्रवास हा नागमोडी वळणाचा आहे. त्यांनी अखिल भारतीय सेनेकडून १९९९ मध्ये खासदारकीची निवडणूक लढविली होती. नंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि आता भाजपमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अब कहाँ जाओंगे असा प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केला जातो.प्रयत्नांती परमेश्वर....शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे हे गेल्या अनेक वर्षांपासून कुठलेना कुठले चांगले पद मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी युतीचे खूप काम केले. परंतु त्यांच्याच पक्षाचे सरकार येऊनही अद्याप त्यांचा पाहिजे तो सन्मान झाला नाही. एक तरूण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परंतु प्रयत्न करायचे तरी किती, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते.गड शाबूत राहिल्याचे समाधान....माजी आ. सुरेशकुमार जेथलिया आणि नशीब यांचे समीकरण आहे. स्थानिक स्वराज्य मतदार संघातून त्यांनी आमदारकी मिळविली होती. नंतर पुन्हा एकदा विधानसभेतून मुंबईत पोहोचले होते. मध्यंतरी त्यांच्यात आणि तत्कालिन पालकमंत्री यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. निवडणुकीत याचा वचपा काढण्याची संधी होती. परंतु पंतप्रधान मोदींच्या सभेने तीही हुकली. आता परतूर नगर पालिका ही त्यांच्या ताब्यात राहिल्याचे समाधान त्यांना आहे.
भूल जाओ सारे गम... खेलो होली के रंग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 12:09 AM