तळणी : मंठा तालुक्यातील दुधा, तळणी येथील शासनमान्य देशी दारू दुकानांतून थेट बॉक्सद्वारे दारूची विक्री होत असेल तर कारवाई करावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिल्या होत्या. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचा मंठा पोलिसांना विसर पडला असून, शासनमान्य दुकानातून थेट बॉक्सद्वारे दारूविक्री केली जात असल्याचे चित्र आहे.
मंठा पोलीस ठाण्यांतर्गत तळणी पोलीस चौकी आहे. तळणी पोलीस चौकीअंतर्गत दुधा व तळणी येथे सरकारमान्य देशी दारुची दुकाने आहेत. या देशी दारू दुकानातून तळणीसह परिसरातील खेड्यापाड्यांतील अवैध दारू विक्रेत्यांना अनधिकृतपणे देशी दारू बॉक्सची सर्रास विक्री सुरु आहे. मागील आठवड्यात पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी तळणी पोलीस चौकीला भेट देऊन दप्तर तपासणी केली. त्यावेळी अवैध दारू विक्रीच्या तक्रारीवरुन मंठ्याचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांना धारेवर धरत अवैध दारू विक्रेत्यासह दुकानचालकावर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, दोन आठवड्यानंतरही एकावरही कारवाई झालेली नाही. विशेषत: अवैध दारूविक्री करणाऱ्यांना बॉक्समधून दारूविक्री सर्रासपणे सुरू आहे.
कारवाई करावी
मंठा शहर व ग्रामीण भागातील दारू दुकानातून सर्रास बॉक्सद्वारे दारूची विक्री केली जाते. अवैध दारूविक्रेते या बॉक्समधील दारू गावागावांत विक्री करू लागले आहेत. त्यामुळे तळीरामांची संख्या वाढत आहे. पोलीस प्रशासनाने दुकानचालकांवर कारवाई करावी.
प्रकाश घुले
जिल्हाध्यक्ष, भीमशक्ती
कारवाई होईल
बॉक्सद्वारे दारूविक्री करणाऱ्यांसह अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची कामे मागे लागली असून, वरिष्ठांच्या सूचनेनुसार कामे केली जात आहेत.
पोनि. विलास निकम
मंठा