आपल्या राज्यातून बाहेर उद्योग चालले कसे यावर जनतेसमोर चर्चा करू, असं आव्हान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलंय. ही चर्चा जिथे तुम्ही करायला तयार आहात तिथे मी येईन, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे हे जालन्यातील सोमठाणा येथे आले होते. यावेळी आयोजित सभेत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना हे आव्हान दिलं आहे.
स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके असं हे सरकार आहे. मात्र कुणाचा शो फ्लॉप झाला याचा मी आनंद साजरा करत नाही, असं देखील ते म्हणाले. मुख्यमंत्री हे नाव न घेता ठाकरे कुटुंबावर टीका करत असून ते ठाकरे परिवाराला संपवायला निघाले हे त्यांनी सांगून दाखवावं, असं आव्हान देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. शिवाय महाराष्ट्राचे ५ तुकडे करण्याचं यांच्या मनात आहे, असं सांगत हे सरकार निवडणूक घ्यायला घाबरते, असा टोला त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला लगावला.