लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, जालना जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. परिणामी, दुष्काळाच्या झळा भर पावसाळ्यात कायम असून, हाताला काम मिळत नसल्याने ४ हजार ५७४ मजूर मनरेगाच्या कामावर उपस्थित आहेत.गतवर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. पाऊस न आल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत ग्रामस्थांचे स्थलांतर होऊ नये, त्यांच्या हाताला कामे मिळावी, यासाठी शासनाच्या वतीने मनरेगा योजनेंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करुन दिली.यावर्षी चांगला पाऊस पडेल, अशी आशा होती. परंतु, पावसाळा सुरु होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत असून, यावर खरीप हंगामाची पिके जगली आहेत. मात्र, मजुरांच्या हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.परिणामी अनेकांनी प्रशासनाने सुरू केलेल्या मनरेगाच्या कामावर जाणे पसंत केले आहे. जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींपैकी १२१ ग्रामपंचायतीमध्ये मनरेगाची विविध प्रकारची ४२७ कामे सुरू आहेत. या कामावर साडेचार हजार मजुरांची उपस्थिती आहे.
साडेचार हजार मजूर मनरेगाच्या कामावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:40 AM