लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन / हसनाबाद : तालुक्यातील तळेगाव, पिंपळगाव कोलतेसह चार गावच्या शिवारात शनिवारी पहाटे एका तरसाने धुमाकूळ घातला. तरसाने केलेल्या हल्ल्यात चार शेतकऱ्यांसह एक मजूर जखमी झाला असून, जखमींवर औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तरसाच्या हल्ल्यात एक म्हैसही जखमी झाली.भोकरदन तालुक्यातील तळेगाव (जि.जालना) शिवारात इलेक्ट्रीक टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. येथे बिहार राज्यातील मजूर काम करीत आहेत. टॉवरजवळ झोपलेले मंगरा मुरम हे शनिवारी पहाटेच्या सुमारास लघुशंकेसाठी उठला होता. त्यावेळी तरसाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याने आरडाओरड करताच इतर मजूर जागे झाले. तोपर्यंत तरस तेथून निघून गेला होता. नंतर या तरसाने पिंपळगाव कोलते गावच्या शिवारात धाव घेतली. पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास पिकांना पाणी देत असलेल्या कौतिकराव हिंमतराव सोळंके यांच्यावर त्याने हल्ला केला. या घटनेनंतर सोळंके यांच्या मुलाने जखमी वडिलांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर या तरसाने पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास देऊळगाव कमान भागात वसंत दौलत पवार यांच्यावर हल्ला करून जखमी केले. तसेच तेथे एका म्हशीवरही हल्ला केला. तर पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास खंडाळा शिवारातील पराजी लक्ष्मण सोनवणे, काकासाहेब दौलत सोनवणे या दोघांवर या तरसाने हल्ला केला. तरसाच्या हल्ल्यात जखमींवर औरंगाबादेतील घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेने चारही गावच्या शिवारात एकच खळबळ उडाली आहे. प्रारंभी बिबट्याने हल्ला केल्याची अफवा या भागात पसरली होती. मात्र, वनविभागाने प्राण्याच्या ठशाची पाहणी केल्यानंतर तो प्राणी तरस असल्याचे सांगण्यात आले.तरसाने एक दोन नव्हे चार गावच्या शिवारातील शेतक-यांवर हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर वनविभागाचे वनपाल संतोष दोडके, वनरक्षक योगेश डोंगरे, एम.बी.जाधव यांनी खंडाळा, देऊळगाव कमानसह इतर गावांना भेटी देऊन पाहणी केली.या घटनेने भोकरदन तालुका व परिसरातील शेतकरी, शेतमजुरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वन विभागाने त्या तरसाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
तरसाच्या हल्ल्यात चार शेतकऱ्यांसह मजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 12:28 AM