लोकमत न्यूज नेटवर्कपारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मात्र विधि सुविधांचा अभाव असल्याने रग्णांना वेळेत सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. अपघाताच्या घटनेत वेळेत शवविच्छेदन, आरोग्य सुविधा वेळेत मिळण्यास अडचणी येत असल्याचा आरोप पारध पोलिसांकडून होत आहे.पारध हद्दीत पिंपळगाव रेणुकाई, वालसावंगी, धावडा, जळगाव सपकाळ आणि आन्वा हे पाच आरोग्य केंद्र आहेत या पैकी जळगाव सपकाळ ह्या आरोग्य केंद्राचेच काम हे समाधानकारक असून इतर चार आरोग्य केंद्र हे शोभेच्या वस्तू ठरत असल्याने रुग्णांमध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे. या आरोग्य केंद्रात आवश्यक त्या औषधी उपलब्ध नसतात तर बऱ्याच आरोग्य केंद्रात रुग्णासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. जळगाव सपकाळचे वैद्यकीय अधिकारी वगळता इतर वैद्यकीय अधिकारी कधीच वेळेवर प्राथमिक केंद्रात हजर रहात नाही. बहुतांश केंद्र हे आरोग्य सेवक, औषध निर्माते व इतर कर्मचा-यांच्या भरवशावर केंद्राचा कारभार सुरु आहे. सध्या परिसरात वातावरण बदलामुळे मोठया प्रमाणात साथीचे रोग पसरले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता वैदयकीय केंद्राचा आधार घेतात पण कधी अधिकारी गैरहजर तर कधी आवश्यक ती औषधी उपलब्ध नसते त्यामुळे रुग्ण या केंद्रात खेटे मारून नाईलाजाने खाजगी दवाखाने जवळ करून महागडा उपचार करून घेतात त्यामुळे प्रशासनाचा गरिबांसाठी मोफत उपचार या उद्देशालाच फाटा बसला आहे. एकतर परिसरात दुष्काळ त्यात सर्वसामान्य रुग्णांना न परवडणारा खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागत आहे.मात्र वरिष्ठ या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ असल्याने या अधिकारी व कर्मचा-यांचे चांगलेच फावत आहे.बहुतांश आरोग्य अधिकारी कर्मचारी औरंगाबाद,जालना,बुलढाणा सारख्या शहरातून येणे जाणे करतात .प्रत्येक आरोग्य केंद्र परिसरात कोट्यवधी रुपये खर्चून अधिकारी कर्मचा-यांसाठी निवासस्थाने बांधलेले आहे मात्र ते ओस पडत आहेत.याकडे जिल्हा आरोग्य विभागाने गांभिर्याने लक्ष देऊन चारही आरोग्य केंद्रात विविध सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकातून होत आहे.
पारध परिसरातील चार आरोग्य केंद्रे कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:24 AM