लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी समाजाच्यावतीने गांधीचमन येथे चार तास निदर्शने केली. या निदर्शने कार्यक्रमास सर्व पक्षीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तसेच या मागण्यांसाठी आम्ही पाठपुरावा करू असे आव्शासनही दिले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्ट मंडळाचे निवेदन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्विकारण्यास वेळ न दिल्याने समाज बांधवानंी तीव्र नाराजी व्यक्त केली.सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत ही निदर्शन करण्यात आली. पूर्वी ब्राह्मण समाजही इतर समाजा प्रमाणे ग्रामीण भागातच राहत होता, परंतु बदलत्या काळात पूर्वी प्रमाणे पौरोहित्य करण्याचे प्रमाण कमी झाल्याने आणि स्वत:च्या मालकिची शेती नसल्याने त्यांना शहराकडे वळावे लागले. तसेच स्पर्धेच्या युगात अन्य समाजाप्रमाणे ब्राह्मण समाजातही मोठी बेरोजगारी वाढली. तसेच व्यवसाय, उद्योग उभारणीसाठी समाजाकडे पुरसे भांडवल नसल्याने ते देखील शक्य नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.या आहेत प्रमुख मागण्याब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण मोफत करण्यात यावे, ब्राह्मण समाजातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करावे, ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करून सामाजिक विडंबनातून मुक्तता करण्यात यावी, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे,ब्राह्मण पुरोहितांना मासिक ५ हजार रुपये मानधन देऊन त्यांची विविध मंदिरात नियुक्ती करावी, ब्राह्मण समाजाला इनामी जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ संवर्गात बदल करण्यात यावा, ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पातळीवर झालेल्या बदलांचा चांगला व वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गट, आयोगाची शासन स्तरावर नेमणूक करण्यात यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांना देण्यात आले.
ब्राह्मण समाजाची चार तास निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 1:11 AM