लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३३ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज सर्वेक्षणात समोर आला आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब फुटले असून, मक्यासह कपाशीला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे काही भागातील पिके पाण्यात आली असून, नदीकाठच्या शेतातील जमीनही वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण म्हणजेच ९७२ गावे अतिवृष्टीने बाधित झाली असून, एकूण ६ लक्ष १५ हजार हेक्टरपैकी ४ लक्ष ३३ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास ५ लाखापेक्षा जास्त शेतकºयांचे यात जवळपास ३२६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. यात कापूस, मका, सोयाबीन, बाजरी या पिकांचा पीकविमा जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भरला आहे. संबंधित विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्त नुकसानीचे मुल्यांकन करण्याबाबत लोणीकर यांनी सूचना दिल्या.लोणीकर यांनी बदनापूर तालुक्यातील भरडखेडा येथील सुभाष खुरमुढे यांच्या शेतातील पिकांची प्रशासकीय अधिकाºयांसमवेत पाहणी केली. यावेळी आ. नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषद सभापती भानुदास घुगे, जिल्हा कृषी अधिकारी शिंदे, तहसीलदार छाया पवार, बद्रीनाथ पठाडे, वसंतराव जगताप, भगवान बारगजे, प्रताप शिंदे, सरपंच बबनराव बारगजे, जगन्नाथ बारगजे, विनायक दराडे, विष्णू दराडे, कृष्णा दराडे, वाल्मिक दराडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.बैलगाडीतून केली नुकसानीची पाहणी...वडीगोद्री : वडीगोद्री व परिसरातील सोयाबीन, बाजरी, कापूस व तूर आदी पिकांच्या नुकसानीची अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार मनीषा मेने यांच्यासह प्रशासकीय अधिकाºयांनी पाहणी करून पंचनामे केले. साष्टपिंपळगाव येथे बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी पथक गेले. मात्र, शेत रस्त्यात दोन ते तीन फूट पाणी व चिखल होता. त्यामुळे शशिकांत हदगल, मनीषा मेने यांनी बैलगाडीत बसून प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.तसेच पाथरवाला खुर्द येथे जवळपास दीड ते दोन किलोमीटर चिखल तुडवत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतक-यांनी आपल्या व्यथा मांडल्या. दरम्यान, अंबड तालुका कृषी अधिकारी भीमराव वैद्य यांच्यासह पथकाने घुंगर्डे हादगाव, वडीगोद्री, धाकलगाव परिसरातील नुकसानीची पाहणी केली.
चार लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्राला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 12:43 AM