जालना : अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टल, दोन मॅगझिन, एक जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. सुभाष विनायक डोलारे (रा. राजेवाडी, ता. बदनापूर), अमोल राजेंद्र देशमुख (रा. शेलगाव, ता. बदनापूर), सोनू संतोष जाधव (रा. नूतन वसाहत, जालना), अनिल सुनिल पाटोळे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. सुभाष डोलारे याने अमोल देशमुख आणि सोनू जाधव यांच्याकडून ५५ हजार रूपयांमध्ये गावठी पिस्टल घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुभाष डोलारे हा गावठी पिस्टल बाळगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने त्याला सेलगाव येथून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल, एक जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्याला गावठी पिस्टल पुरविणारे अमोल देशमुख आणि सोनू जाधव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच पोलिसांनी सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनही अनिल सुनिल पाटोळे या संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी पिस्टल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप, सागर बावीस्कर, संतोष श्रीवास, योगेश सहाणे, कैलास चेके, सौरभ मुळे यांनी केली आहे.