जालना : जालन्यातून ट्रक चोरी करुन धुळ्यात त्याची विल्हेवाट लावणाऱ्या चौघांना चंदनझिरा पोलिसांनी सोमवारी अटक केली. सुरेश पाटील (रा. बोरीस जि. धुळे), अफजल हुसेन (रा.धुळे), जगन्नाथ शंकर सोनवणे, धम्मपाल चंपतराव विनकर (दोघे रा. वाळूज जि. औरंगाबाद) असे आरोपींची नावे आहेत.
संजय जगन्नाथ अंपळकर (रा. श्रीकृष्णनगर, जालना) यांनी १६ जुलै रोजी १० टायर ट्रक चोरी गेल्याची तक्रार चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरुन पोलीस निरीक्षक कौठाळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रकचा शोध घेण्याचे आदेश दिले. या ट्रकचा शोध घेत असतांना पोलिसांना माहिती मिळाली की, सदर ट्रक हा सुरेश पाटील ( बोरीस, रा. धुळे) याच्या जवळ आहे. या माहितीवरुन पोलिसांचे एक पथक धुळे येथील बोरीस येथे गेले. बोरीस येथे सुरेश पाटील याचा शोध घेवून त्याला शिताफिने ताब्यात घेवून सदर गुन्ह्या बाबत विचारपूस केली असता, त्याच्या शेतामध्ये ट्रक तोडले असल्याची त्याने कबूली दिली. त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्याने सदरील ट्रक हा अफजल हुसेन याच्याकडून घेतल्याचे सांगितले.
अफजल हुसेनला धुळे येथून ताब्यात घेवून त्यास विचारपूस केली असता, ही ट्रक औरंगाबाद येथील जगनाथ सोनवणे व धम्मपाल विनकर यांनी दिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर या दोन्ही आरोपींना करमाड येथून ताब्यात घेवून त्यांना विचारपूस केली असता, त्यांनी सदर ट्रक हा वरकड हॉस्पीटल नवीन मोंढा येथून चोरुन नेल्याची कबूली दिली. तसेच २ जून रोजी प्रकाश ट्रांसपोर्ट येथून अशोक लेलँन्ड कंपनीचा १० टायरचा ट्रक चोरुन नेल्याची कबूलीही त्यांनी दिली. त्यांच्याकडून सदर ट्रकचे अनेक सुट्टे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पोहेकॉ वाघमारे हे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि. राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शामसुंदर कौठाळे, सपोनि. आर. एस. सिरसाट, पोहेकॉ वाघमारे, कर्मचारी अनिल काळे, कृष्णा भडंगे, जावेद शेख यांनी केली.