जालना : मौलाना असल्याचे दाखवत कोट्यावधी रुपयांच्या वक्फ बोर्डाच्या असलेल्या जागेत प्लॉट, घरे बांधून विक्री करुन अनेकांची फसवणूक करणाऱ्याविरुध्द सोमवारी रात्री उशीरा सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद जमीन सय्यद जानीमिया (मौलाना), शेख वहीवोद्दीन शेख फकरोद्दीन, मोहम्मद मुसा मोहम्मद वाहेद असे संशयीत आरोपींची नावे आहे.
या तिघांनी जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या दर्ग्याचा बनावट कागदपत्राआधारे मौलाना असल्याचे दाखविले. दर्गा परिसरात असलेल्या वक्फ बोर्डाच्या १८ एकर १६ गुंठे जमिनीत प्लॉट, बंगले, घरे बांधून त्याची नोटरी आधारे विक्री केली. यात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला असून, अनेक जणांची फसवणूक झाली असल्याचे ठाणे अंमलदार हरणे यांनी सांगितले.
या प्रकरणात अजीज अहेमद सिरसाज अहेमद (सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी, वक्फ बोर्ड, औरंगाबाद) यांच्या फियार्दीवरुन सय्यद जमीन सय्यद जानीमिया (मौलाना), शेख वहीवोद्दीन शेख फकरोद्दीन, मोहम्मद मुसा मोहम्मद वाहेद यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर हे करीत आहेत.