लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काँग्रेसचे पक्षाध्यक्ष तथा खा. राहुल गांधी यांनी आता संघटना बांधणीला मोठे महत्व दिले असून, आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता, आवश्यक ती सर्व तयारी काँग्रेसने केली आहे. वन बूथ टेन युथ तसेच सोशल मीडिया संदर्भातही काँग्रेसने आता नवीन धोरण स्वीकारले आहे. काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे नेते सज्ज झाले असल्याची माहिती नूतन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.येथील गुरूगणेश भवनमध्ये हे काँग्रेसचे जिल्हा पातळीवरील शिबीर होणार आहे. यासाठी जिल्हाभरातून जवळपास एक हजार पदाधिकारी सहभागी होतील असे देशमुख यांनी सांगितले. हे शिबीर चार सत्रात घेण्यात येणार आहे. यासाठी मार्गदर्शक म्हणून राज्य सहप्रभारी संपतकुमार, मराठवाडा बुथ कमिटीचे समन्वयक माजी तुकाराम रेंगे, काँग्रेसचे केंद्रीय पातळीवरील चार तज्ज्ञ प्रशिक्षक येणार आहेत. यावेळी आ. नरहरी रूपनवार यांचेही प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले असल्याचे सांगण्यात आले.आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार राहणार की, बाहेरच्या पक्षातून येणारा असा प्रश्न विचारला असता, तसे अद्याप काहीच ठरले नाही. आम्ही काँग्रेसकडून तीन ज्येष्ठ नेत्यांची नावे काँग्रसच्या वरिष्ठांकडे पाठवली आहेत. त्या नंतरही हायकमांड जो निर्णय घेतील तो आंम्हाला मान्य राहील अशी माहिती माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. यावेळी काँग्रेसला पोषक वातावरण असून, केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे,या त्यांच्या चुकीच्या निणर्यांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे गोरंट्याल म्हणाले. पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष शेख महेमूद, राजेंद्र राख, भोकरदन तालुका अध्यक्ष त्रिबंक पाबळे, राम सावंत आदींची उपस्थिती होती.
काँग्रेसचे शुक्रवारी प्रशिक्षण शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:37 AM