पोलिसांनी शिताफीने घेतले ताब्यात
जालना : गुजरात येथील तीन युवकांसोबत बनावट लग्न करून लाखो रुपयांना लुटणाऱ्या टोळीस चंदनझिरा पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. तीन खोट्या नवऱ्या, टोळीप्रमुख महिलेसह एकास अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच गुजरात येथील तीन युवकांसोबत बनावट लग्न करून तीन मुली पळून केल्याची तक्रार गुजरात येथील पीयूष वसंत यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिली होती. सदरील गुन्ह्याचा तपास करत असताना, बनावट नवरी बनलेली मुलगी जालना शहरातील शनिमंदिर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सदरील मुलीला ताब्यात घेतले. त्या मुलीला अधिक विचारपूस केली असता, तिने बनावट लग्न केल्याची कबुली दिली. तिने इतर महिलांची नावे व राहण्याचे ठिकाण सांगितले. औरंगाबाद, बुलडाणा, जालना येथून तीनही महिलांना ताब्यात घेण्यात आले. नवरीचा भाऊ बनून त्यांच्यासोबत असणारा राहुल म्हस्के (रा. नागेवाडी) याला नागेवाडी टोलनाका येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५ महागडे मोबाइल, बॅग, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली क्रूझर गाडी असा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पो.नि. श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी अनिल काळे, विजय साळवे व महिला नाईक रेखा वाघमारे यांनी केली.
विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
पोलिसांनी टोळीप्रमुख महिलेला बुलडाणा येथून ताब्यात घेतले आहे. या महिलेने औरंगाबाद, बीड व बुलडाणा जिल्ह्यांतही बनावट लग्न करून अनेकांना फसवले आहे. या महिलेवर औरंगाबाद जिल्ह्यातील मुकुंदवाडी व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सर्वच आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.