सहा कोटींचा निधी : आ. गोरंट्याल
जालना : शहरातील तीन प्रमुख रस्त्यांच्या कामांसह प्रीती सुधानगरमधील भूमिगत नाली बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने जालना नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या निधीतून ही कामे लवकरच सुरू करणार असल्याची माहिती आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली.
शहरात काही दिवसांपूर्वीच सुमारे ३० कोटी रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या सहा रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केंद्रीय रेेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, अक्षय गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याच कार्यक्रमात बोलताना आ. कैलास गोरंट्याल यांनी शहरातील काही प्रमुख रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली होती. या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करीत आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून शहरातील तीन रस्त्यांच्या सिमेंटीकरणासह भूमिगत नाली बांधकामासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून शोला चौक ते रामदेव बाबा मंदिर, टिपू सुलतान चौक ते पित्ती पेट्रोल पंप, गाढे चौक ते लक्की ज्युस सेंटर मार्गे दीपक हॉस्पिटल, प्रीती सुधानगर अंतर्गत भूमिगत नाली बांधकाम ही कामे हाती घेतली जाणार असल्याचे सांगून शहरातील प्रलंबित कामांसाठी राज्य शासनाकडून आणखी भरीव निधी खेचून आणणार असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले.