लेहा : येथील एका वृद्ध महिलेवर स्मशानभूमीच्या वादातून तब्बल चोवीस तासानंतर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी महसूल व पोलीस अधिका-यांनी दोन समाजातील नागरिकांची समजूत घातल्याने तणाव निवळला.येथील सुंदरबाई विष्णू काकफळे (७५) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गावातील बौद्ध व मातंग समाजातील स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून सुंदरबाई यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार झाले नाही. दोन समाजातील स्मशानभूमीचा वाद असल्यामुळे तहसीलदार योगिता कोल्हे, नायब तहसीलदार डी.एस.सोनुने, मंडळाधिकारी एस.टी.गारोळे, पारध ठाण्याचे सहायक निरीक्षक सुदाम भागवत, जाफराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार पाटील हे पोलीस बंदोबस्तासह गावात पोहोचले. जालन्याहून पोलिसांची एक तुकडीही लेहा येथे बंदोबस्त कामी पोहचली. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले. तहसीलदार कोल्हे यांनी दोन्ही समाजातील नागरिकांशी वादग्रस्त जागेबाबत चर्चा केली. दोन्ही समाजाला स्मशानभूमीसाठी जाग उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले. दोन्ही समाजांतील नागरिकांची समजूत घातली. त्यानंतर सुंदरबाई यांच्यावर दुपारी चार वाजता पोलीस बंदोबस्तात अंत्यस्कंस्कार करण्यात आले.
वृद्धेवर बारा तासानंतर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 11:33 PM