जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून युरोप, अमेरिकेत ज्याप्रमाणे ट्रेन असतात, त्यांच्या तुलनेत दर्जेदार अशा भारतीय बनावटीच्या वंदे भारत रेल्वे तयार करण्यात आल्या आहेत. आज महाराष्ट्रातील सहावी वंदे भारत रेल्वे जालन्यातून धावत असून, ही जालनाच नव्हे तर मराठवाड्यासाठी आनंदाची बाब आहे. यापुढे लातूर येथील कोच फॅक्ट्रीत वंदे भारत ट्रेनची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अयोध्या रेल्वे स्थानकावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुपारी दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे, आ. बबनराव लोणीकर, आ. कैलास गोरंट्याल, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. राजेश राठोड, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, जालना-मुंबई वंदे भारत रेल्वेचे नागरिकांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले.
२०२४ पर्यंत इलेक्ट्रिफिकेशनचे काम : दानवेमराठवाड्यातील नागरिकांना राजधानी मुंबई येथे कामानिमित्ताने जाण्याची उत्तम सोय व्हावी, या उद्देशाने जालना येथून वंदे भारत रेल्वेचा आज शुभारंभ करण्यात आला आहे. या रेल्वेची प्रवासी क्षमता ५३० एवढी असून, एकूण आठ डबे जोडले आहेत.
देशात वंदे भारत रेल्वेंची संख्या ३४ झाली आहे. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानच्या रेल्वे दुहेरीकरणासाठी एक हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. मार्चपर्यंत काम सुरू होणार आहे आणि पुढील मार्गाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.
त्यालाही पैसे उपलब्ध करून दिले आहेत. देशात २०२४ पर्यंत संपूर्ण ब्रॉडगेजवर इलेक्ट्रिफिकेशनचे काम पूर्ण होणार आहे. सध्या ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.
राज्यात एक लाख सहा हजार कोटींची कामे सुरू पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात रेल्वेचा अभूतपूर्व विकास होत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे यासाठी विशेष प्रयत्न आहेत. राज्यात एक लाख सहा हजार कोटींची रेल्वेची कामे सुरू आहेत. यंदा १३ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. यातून अनेक कामे होणार आहेत. जसजसे रुळांचे मजबुतीकरण होईल, तसतशी ही ट्रेन पुढील दोन वर्षांत तासी २५० किलोमीटरच्या वेगाने चालेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.