कैलास ब्रिगेडने घडवून आणला अनोखा विवाह
जालना : जालना शहरातील कैलास ब्रिगेड या सामाजिक संस्थेने पालकत्व स्वीकारलेल्या श्याम व माया या बेघर व दृष्टिहीन दाम्पत्याचा विवाह शुक्रवारी लोकप्रतिनिधी, अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या साक्षीने थाटात पार पडला. विवाहबद्ध झालेल्या या दृष्टिहीन दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे बोलके चित्र या विवाहात पाहायला मिळाले.
कैलास ब्रिगेड ही सामाजिक संस्था जालना शहरातील रेल्वेस्थानक मार्गावर आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र चालवून बेघरांना आधार देण्याचे कार्य करीत आहे. या बेघर निवारा केंद्रात २४ जून २०२१ रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील तांबारातुरी येथील शाम बाबा तांबे हा ३८ वर्षीय दृष्टिहीन तरुण दाखल झाला. गायनाचा छंद असलेला श्याम तांबे हा उत्तम हस्तकलाकारही आहे. तांबे हा आपुलकी बेघर निवारा केंद्रात दाखल झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील व बारामती तालुक्यातील खांडच येथील माया महादेव कांबळे ही ३६ वर्षीय बेघर दृष्टिहीन तरुणी आपुलकी बेघर निवारा केंद्रात ३० जून रोजी दाखल झाली. कैलास ब्रिगेड या सामाजिक संस्थेने या दृष्टिहीन जोडप्याचा आगळावेगळा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. आमदार कैलास गोरंट्याल यांनी या दृष्टिहीन जोडप्याच्या विवाहासाठी मोलाचे सहकार्य केले, तर कैलास ब्रिगेडचे अध्यक्ष अरुण सरदार व सचिव वैशाली सरदार यांनी या दृष्टिहीन जोडप्याचे पालकत्व स्वीकारले. या विवाहासाठी जालना शहरातील सामाजिक संस्थांनी मदतीचे हात पुढे केले. आमदार कैलास गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या विवाह सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून नगर पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, ग्रामविकास विभागाचे अव्वर सचिव संतोष कराड, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संग्राम ताठे, राष्ट्रीय नागरी उपजीविका शहरी अभियानाचे व्यवस्थापक विजय सांगळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक महावीर ढक्का, सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक, डॉ. रवींद्र देशमुख, डॉ. संजय रुईखेडकर, डॉ. रुईखेडकर, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानदेव पायगव्हाणे, सुषमाबाई पायगव्हाणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, आपण आतापर्यंत मोठमोठे विवाह सोहळा बघितले, असा दृष्टिहीन जोडप्याचा विवाह प्रथमच बघत आहोत, या विवाहमुळे मनाला समाधान लाभून आनंदही झाला आहे. दृष्टिहीन असलेल्या श्याम व माया यांच्या आयुष्यात उजेड पेरण्याचे कार्य कैलास ब्रिगेड या सामाजिक संस्थेने केले आहे. या कैलास ब्रिगेडचे अध्यक्ष अरुण सरदार व सचिव वैशाली सरदार यांनी या दृष्टिहीन जोडप्याचे पालकत्व स्वीकारले आहे, ही एक खूप मोठी बाब आहे, असेही ते म्हणाले.