जालना : गजानन तौर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी विलास देवीदास पवार उर्फ टायगर याला अमृतसर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विलास पवार याचा शोध घेण्यासाठी जालना पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २० दिवसांत तब्बल ९६०० किलोमीटरचा प्रवास केला.
जालना शहरातील मंठा चौफुलीवर ११ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गावठी पिस्तुलने गोळीबार करीत, फायटर, चाकूने वार करीत गजानन मच्छिंद्र तौर यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भागवत विष्णू डोंगरे, लक्ष्मण किसन गोरे, रोहित नरेंद्र ताटीपामुलवार यांना अटक केली होती. या प्रकरणात मोक्कांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.
या खून प्रकरणातील मुख्य आरोपी विलास पवार उर्फ टायगर हा घटनेनंतर फरार होता. नावे आणि वेश बदलून तो विविध राज्यांत वावरत होता. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखा व तालुका पोलिस ठाण्याचे पथक कार्यरत होते. पथकाने बिदर (कर्नाटक) येथे त्याचा शोध घेतला. तसेच राजस्थान, पंजाब राज्याच्या विविध भागांतही शोध घेण्यात आला. अमृतसर येथे तीन दिवस शोध घेऊन पथक मिळालेल्या माहितीनुसार बिदरला पुन्हा शोधासाठी गेले होते. पोलिसांनी अधिक शोध घेतला असता पवार हा अमृतसरमध्येच असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथक त्याचा शोध घेत असताना पवार याला अमृतसर पोलिसांनी अटक केल्याचे समजले. तो नाव व वेश बदलून तेथे वावरत असताना एका गुन्ह्यात पोलिसांच्या हाती लागला होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जालना पोलिसांनी पवार याला ताब्यात घेतले. त्याला बुधवारी रात्री अटक करून गुरुवारी सकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
इतर राज्यांतील अधिकाऱ्यांशी समन्वयपोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी गोपनीय माहिती घेत कर्नाटक, पंजाब राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी वेळोवेळी समन्वय साधला. या समन्वयातून मिळणारी माहितीही या तपासात कामी आली होती.
यांनी केली कारवाईही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रामेश्वर खनाळ, पोउपनि. एस.आर. उनवणे, विशेष पथकातील पोउपनि. के. ए. वनवे, विलास आटोळे, सॅम्युअल कांबळे, सचिन चौधरी, लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत माळी, सागर बाविस्कर, जावेद खान, हारूण पठाण, रामेश्वर कुऱ्हाडे आदींच्या पथकाने केली.
मास्टर माइंड कोण?गजानन तौर यांच्या खून प्रकरणातील मास्टर माइंड कोण, कोणत्या कारणामुळे गजानन तौर यांची हत्या करण्यात आली हे टायगर याच्याकडे चौकशी केल्यानंतर समोर येणार आहे. शिवाय इतर माहितीही पोलिसांच्या हाती येणार असून, पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.
टायगरविरुद्ध नऊ गुन्हेया प्रकरणातील मुख्य आरोपी विलास पवार उर्फ टायगरविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. जालन्यातील सेवली, घनसावंगी, तालुका जालना या तीन ठाण्यात तर इंद गुन्हे नांदेड जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांत दाखल असल्याचे पोलिस अधीक्षक बंसल यांनी सांगितले.