लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आजचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. जवळपास बहुतांश जणांकडे स्मार्ट फोन उपलब्ध आहे. त्यातच बँक खातेदेखील मोबाईलमध्ये लिंक असल्याने सर्व व्यवहार चुटकीसरशी होतात. कॅशलेश व्यवहारांना कोरोना काळात मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. याच काळात अनेकांना केवायसीची मागणी करून डिजिटल भामट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे दिसून आले.
डिजिटल भामट्यांकडून प्रथम तुमचा मोबाईल क्रमांक शोधून तुमच्याकडून गोड बोलून तुमचा बँक खाते क्रमांक, एटीएम कार्डचा क्रमांक, मोबाईलवर आलेला ओटीपी मागवून घेतात. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या योजनेतून पैसे तुमच्या खात्यात जमा करायचे आहेत, असे सांगून नागरिकांची दिशाभूल केली जाते. या आमिषाला बळी पडून आपल्या बँक खात्याची, एटीएमची सर्व माहिती नागरिक देतात. यामध्ये महिलावर्गाला अधिक प्रमाणावर गंडविले जाते.
प्रकरण १
जालना शहरातील एका नामांकित बँकेचे एटीएम कार्ड असलेल्या नागरिकाकडून केवायसी मागवून त्याच्या खात्यातून जवळपास ७ लाख रुपये एका मिनिटात वर्ग करण्यात आले. याप्रकरणी संबंधित नागरिकाने जालना येथील सायबर सेलकडे तक्रार केली आहे. परंतु तीन महिने होऊनही या प्रकरणात पोलिसांनी कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे आपण ग्राहक मंचात धाव घेतल्याचे प्रसन्ना देशपांडे यांनी सांगितले.
प्रकरण २
अनेक नागरिकांकडे वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला जातो. यात प्रामुख्याने महिलाही संपर्क साधतात. जेणेकरून महिलांच्या बोलण्यावर अनेकजण आपली सर्व माहिती देतात आणि बळी पडतात. जालन्यातील एका शिक्षकाकडे त्याच्या खात्याचा सर्व तपशिल विचारण्यात आला. त्यानेदेखील सर्व माहिती देताच दुसऱ्या मिनिटाला त्याच्या खात्यातून रक्कम गेल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर शिक्षकाने दिली.
प्रकरण ३
मी जालना शहरातील असून, अनोळखी क्रमांकावरून मोबाईल आल्यानंतर प्रवासात असताना एटीएमसंदर्भातील सर्व माहिती देऊन मोबाईलवर आलेला ओटीपी सांगितला. आलेल्या क्रमांकावरून केंद्र सरकारच्या विविध योजनांतील रक्कम तुमच्या खात्यावर जमा करायची आहे, असे सांगितले. त्यामुळे आपण घाई गडबडीत ही माहिती दिली. यानंतर माझ्या खात्यातील जवळपास २२ हजार रुपये परस्पर काढले गेले.
बँकेकडून कधीच विचारणा होत नाही
डिजिटल युगामध्ये तेवढ्याच गतीने फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. तुमची अधिकृत असलेली बँक ही तुम्हाला केवायसीबद्दल मोबाईलवरून कधीच माहिती विचारत नाही. त्यामुळे कोणीही अशी माहिती विचारल्यास ती न देता संबंधित क्रमांकाची माहिती पोलिसांना द्यावी.
जालना जिल्ह्यात डिजिटल फसवणुकीच्या तीसपेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. त्यातील आठ ते दहा जणांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना गेलेले पैसे परत केले आहेत. यापुढे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
- मारोती खेडकर,
पोलीस निरीक्षक सायबर सेल