लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजच्या वर्तमानात गांधी समजून घेतल्याशिवाय पर्यायच नाही. जीवनातील प्रत्येक परिवर्तन हे गांधी विचारांवर केंद्रीभूत झाल्यास ते निश्चित मानवी कल्याणाचे असेल, असे प्रतिपादन श्रीनिवास भक्कड यांनी केले.येथील जेईएस महाविद्यालयातीलमहात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने ‘१५० नंतर गांधी’ या विषयावर १६ वे राज्यस्तरीय गांधीविचार अभ्यास शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून संस्थेचे सचिव श्रीनिवास भक्कड बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, राष्ट्रीय युवा संगठनचे मनोज ठाकरे, प्रशांत नागोसे, केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागतपर मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काबरा म्हणाले, अशा शिबिरांची आज तरुणाईला खरी गरज आहे. म्हणून अशा शिबिरात शिबिरार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राष्ट्रीय युवा संगठनचे माजी संयोजक मनोज ठाकरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, अशा राज्यस्तरीय शिबिरातून अनेक तरुणांना जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. हे शिबीर म्हणजे आपले प्रतिबिंब दाखविणारा आरसा असतो. यातूनच आपले व्यक्तित्व घडत असते, असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन महावीर सदावर्ते यांनी तर आभार डॉ. व्ही. बी. उगले यांनी मानले. याप्रसंगी शहरातील ज्येष्ठ नागरिक, प्राध्यापक, वकील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, दुपारी झालेल्या परिसंवादात प्रा. प्रशांत नागोसे यांनी शिबीर आणि जीवन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. गुरूवारी जलवायू परिवर्तन या विषयावर सोपान जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत.
गांधीजी यांचे विचार मानवी कल्याणाचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 1:08 AM