जालना: बळजबरी माेबाइल हिसकावून घेणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ताब्यात घेतले. विजय ऊर्फ सोनू अनिल थोरात (२२ रा. सुंदरनगर, चंदनझिरा, जालना), विशाल शिवाजी मिश्रा (२१ रा. सुंदरनगर, जालना), राजू देविदास ढेंबरे (२५ रा. मारुती मंदिराजवळ सुंदरनगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्यांच्याकडून दुचाकी व मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
जुना मोंढा भागातील परिवार शॉपीच्या जवळ संतोष बोबडे यांचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या तिघांनी चोरला होता. याप्रकरणी शनिवारी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करीत असताना, सदरील चोरी ही संशयित विजय थोरात याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याला चंदनझिरा परिसरातून ताब्यात घेतले. त्याला सदरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्याचे साथीदार विशाल मिश्रा, राजू ढेंबरे यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. त्यांना अधिक विचारपूस केली असता, त्यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये एका व्यक्तीला अडवून त्याचा मोबाइल हिसकावून घेतल्याची कबुली दिली. अवघ्या १२ तासांत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. प्रमोद बोंडले, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, कैलास खाडे, दीपक घुगे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, कैलास चेके, योगेश सहाणे, धीरज भोसले, संजय राऊत आदींनी केली आहे.