जालना : जालना शहर व परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दियासिंग बरयामसिंग कलाणी, अर्जुनसिंग प्रितीसिंग कलाणी (दोघे रा. आझादनगर), किसनसिंग रामसिंग टाक (रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यामार्फेत माहिती मिळाली की, जालना शहर व परिसरात घरफोड्या करणारे तिघे नविन मोंढा परिसरात आहे. या माहितीवरुन पोलिसांनी सदरील आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशी दरम्यान आरोपींनी हरगोविंद नगर, वृंदावन रेशीडेन्सी साईनगर, अंबड रोड, महेश नगर नवा मोंढा, माऊली नगर, समर्थनगर, सहयोग नगर या ठिकाणी घरफोड्या केल्याची कबूली दिली.
त्यांच्याकडून २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व इतर पाच घरफोडीतील १८८ ग्रॅम सोन्याचे दागिने असे एकूण २०८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ६ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सानप, जयसिंग परदेशी, कर्मचारी कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, गोकुळ कायटे, विनोद गडदे, फुलचंद हजारे, रणजित वैराळ, कृष्णा तंगे, अंबादास साबळे, सचिन चौधरी, विलास चेके, हिरामण फलटणकर, संदीप मांटे, अशा जायभाये, सारिका गोडबोले यांनी केली आहे.