रूग्णालयास भेट
राजूर : राजूर येथील ग्रामीण रुग्णालयाला शिवसेनेच्या वतीने एलईडी टेलिव्हिजन भेट देण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार संतोष सांबरे, जि.प. सदस्य कैलास पुंगळे, विष्णू पुंगळे, राम पारवे, रतनकुमार नाईक, डॉ. रिचा टेकवानी, डॉ. संदीप घोरपडे आदींची उपस्थिती होती.
शिंगणे विद्यालयात समुपदेशन कार्यक्रम
जाफराबाद : तालुक्यातील हिवराकाबली येथील भास्कररावजी शिंगणे विद्यालयात राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एम. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. सोनटक्के, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय बोर्डे, सागर दांडगे, डॉ. शिवहरी साळवे, धोंडीराम कउटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तलाठ्यांच्या बदलीची चौकशीची मागणी
भोकरदन : भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील तलाठ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या नियमबाह्य झाल्या असून, त्या रद्द करून खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी मनिष श्रीवास्तव, शेख नजिर म.इलियास, भूषण शर्मा, महेश पुरोहित, शेख शाहरुख शेख कमर आदींची उपस्थिती होती.
डॉ. बोणे यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार
घनसावंगी : तालुक्यातील राणी उंचेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल बोने यांचा अंतरवाली दाई ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच बाळासाहेब बरसाले, उपसरपंच रामेश्वर बरसाले, नवनाथ लोहकरे, ज्ञानदेव बरसाले, सुरेश काळे, मदन गोटे, शेषराव गंदाखे, नारायण बरसाले, सुभाष बरसाले हे हजर होते.
नुकसान भरपाई देण्याची मागणी
घनसावंगी : घनसावंगी तालुक्यातील गुंज येथे मार्च महिन्यामध्ये गारपीट होऊन सर्व पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले होते. नुकसानीचे एप्रिलमध्ये पंचनामे देखील केले होते. परंतु, शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
इंटरनेट सेवा कोलमडल्याने अडचण
धावडा: भोकरदन तालुक्यातील धावडा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत गत पाच दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अडचणीचे ठरत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून शेतकरी पीककर्जासाठी बँकेत चकरा मारत आहेत. तासनतास शेती कामे सोडून बसावे लागत आहे. लक्ष देण्याची मागणी होत आहे.
काळेगाव येथे २०० जणांचे लसीकरण
जालना : जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथे कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात येत आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत २०० ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी पहिल्या लसीपासून ८४ दिवस पूर्ण झालेल्या ग्रामस्थांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. मंगळवारी जनार्दन गिराम यांना लस टोचून लसीकरणाची सुरुवात करण्यात आली.