लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकाने तीस वर्षीय महिलेच्या ताब्यातून चार किलो गांजा जप्त केला. याची बाजार किंमत ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुना जालन्यातील शेर सवार दर्गा रस्त्यावर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली.शहरातील रामतीर्थ पुलावरून दु:खीनगरकडे जाणा-या रस्त्याने एक महिला बॅगेत गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने दु:खीनगरकडे जाणा-या रस्त्यावर सापळा लावला. संशयित महिला सेर सवार दर्गाजवळ आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. तसेच तिच्याकडील बॅगेची झडती घेतली. बॅगेत दोन पॅक केलेल्या गठ्ठ्यांमध्ये गांजा आढळून आला. मूळ जालना येथील रहिवासी असलेल्या या महिलेने हा गांजा बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीहून आणला होता. पोलिसांनी पंचनामा करून गांजा जप्त केला असून, या प्रकरणी आणखी काही जणांवर कारवाईची शक्यता आहे. महिलेवर कदीम जालना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी सचिन बारी, सहायक उपनिरीक्षक रामदास काकडे, संजय कटके, कल्याण आटाळे, अनिल काळे, देवा जाधव, महिला कर्मचारी बांडे, दादाराव चव्हाण, हरुन पठाण, देवाशिष वर्मा, पूनम सुलाने यांनी ही कारवाई केली.
महिलेच्या ताब्यातून ६० हजारांचा गांजा जप्त; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:27 AM