जालना : गेल्या वर्षभरापासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. त्यातच महागाई असल्याने कुटुंबाचा गाडा कसा चालविणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात घरगुती गॅसच्या दरात तब्बल २४० रुपयांनी वाढ झाली आहे, तर केवळ तीन रुपये सबसिडी मिळत आहे. जालन्यात घरगुती गॅसचा दर ८४३ रुपये ५० पैसे, तर जमा होणारी सबसिडी केवळ तीन रुपये मिळत आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
मागील काही दिवसांपासून गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सिलिंडर दरांमध्ये झालेल्या घसघशीत वाढीमुळे आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी तसेच गरज पडली तर जेवण करण्यासाठी चूल पेटवायलाच लागते.
- संगीता पवार, गृहिणी
कोरोनाने कमावत्या माणसाची नोकरी गेली. गेले दीड वर्ष आम्ही काटकसरीने राहतोय. सिलिंडर गॅस आता नकोसा वाटू लागला आहे. त्यामुळे चूल पेटविल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जरी शहरात राहत असलो तरी सर्वसामान्य आहोत. त्यामुळे चुलीवरचेच जेवण करावे लागते.
-मंदा गायकवाड, गृहिणी