जामखेड : मागील काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याने गरीब कुटुंब हैराण झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत मिळालेला मोफत गॅस बंद करून गृहिणी चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे जामखेड परिसरातून दिसून येत आहे.
गोरगरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळावे, तसेच महिलांची धुरापासून सुटका व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले. त्यामुळे महिलांची धुरातून सुटका झाली होती, परंतु मागील काही दिवसांपासून गॅसचे दर वाढत आहे. आता गॅस जवळपास ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे बहुतांश महिला गॅसवर स्वयंपाक करण्याऐवजी चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहे.
चुलीतून पुन्हा धूर
सर्वत्र अनलॉक झाल्यानंतरही रोजगाराचा अभाव आहे. दोन वेळेस पोट भरण्याची भ्रांत कायम असतानाही स्वयंपाकासाठी लागणारा गॅस सिलेंडर तरी कसा आणायचा ? असा प्रश्न उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसमोर आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातील चुलीतून पुन्हा धूर येऊ लागला आहे.
कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच खराब झालेली आहे. वाढत्या महागाईने तर सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले आहे. त्यात गॅसची दरवाढ ही डोकेदुखी बनली आहे. आम्ही आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस चुलीवर स्वयंपाक करतो.
मनिषा जाधव, गृहिणी
गॅसचे दर वाढल्यामुळे चुलीचा वापर वाढला आहे. सरकारने रॉकेल देणे बंद करून सर्वसामान्य मोठे नुकसान केले आहे घरातील सर्व किचन गॅस वरच असल्याने आम्हाला महिन्याला एक टाकी लागते सरकारने दर कमी करावे.
आरती वैद्य गृहिणी