जालना : समलिंगी संबंध प्रस्थापित करण्यासाठी फेमस असलेल्या ‘बोल्ड गे’ या ॲपच्या माध्यमातून ओळख झाली. दोघांचे समलैंगिक संबंध जुळले. त्यातील बँक अधिकाऱ्याचे एका महिलेसोबतही अनैतिक संबंध जुळले. यावरून वाद झाल्याने बँक अधिकाऱ्याची हत्या झाल्याचे तपासात उघडकीस झाले. प्रदीप भाऊराव कायंदे असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. सीसीटीव्हीसह तांत्रिक पुराव्याच्या मदतीने दोन आरोपींना शुक्रवारी जेरबंद केले, अशी माहिती मंठा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली आहे.
मंठा येथील बाजार समितीच्या आवारामध्ये प्रदीप भाऊराव कायंदे (४०, रा.उंबरखेड, ता.देऊळगाव राजा जि.बुलढाणा) यांचा ८ एप्रिल रोजी मृतदेह आढळून आला होता. ते एका बॅंकेत वसुली अधिकारी म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंठा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी या प्रकरणाची सूत्रे हाती घेऊन वेगवेगळ्या टीम तयार करून तपासचक्रे फिरविली. पोलिसांनी सीसीटीव्ही, तांत्रिक तपासाच्या माध्यमातून संशयित आरोपींचा शोध घेतला.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी व मयत प्रदीप कायंदे यांची समलिंगी संबंध प्रस्थापित करण्यासाठी फेमस असलेल्या ‘बोल्ड गे’ या ॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती. प्रदीप यांचे नोकरीचे मुख्यालय जालना येथे होते, ते उंबरखेड येथून नेहमी जालना येथे दुचाकीवरून ये-जा करीत होते. मात्र, अनेकदा घरी पत्नी-मुले असतानाही समलिंगी संबंधाची चटक लागलेले प्रदीप हे गावी न जाता, थेट मंठा येथे त्याच्या समलिंगी मित्राकडे जात होते.
७ एप्रिल रोजी ड्युटी आटोपून प्रदीप कायंदे हे रात्री जालना येथून थेट मंठा येथील संशयिताच्या घरी मुक्कामाला गेले होते. त्यांनी मित्रासोबत समलैंगिक संबंध असतानाच, एका महिलेसोबतही अनैतिक संबंध ठेवले. ही बाब आरोपीसह समजली, यावरून प्रदीप कायंदे यांना चार जणांनी काठी व बांबूने बेदम मारहाण करून आणि डोक्यावर घाव घातले. यातच प्रदीप कायंदे ठार झाले. त्यांचा मृतदेह दुचाकीवर टाकून दोघांनी बाजार समितीच्या आवारात असलेल्या जगदंबा जिनिंगमध्ये नेऊन टाकला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.