लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेतील दहावीच्या परीक्षा केंद्रावरून भूमितीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला. ही घटना शनिवारी सकाळी घडली असून, या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर धाव घेतली. दरम्यान, हा प्रकार आष्टी येथे घडला नसल्याचे केंद्रप्रमुखांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.आष्टी येथील जिल्हा परिषद शाळा आणि लाल बहादूर शास्त्री विद्यालय असे दहावी परीक्षेची दोन केंद्रे आहेत. या केंद्रांवर शनिवारी सकाळी भूमिती विषयाचा पेपर सुरू झाला. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच व्हॉटस्अॅपवर पेपर व्हायरल झाला. व्हॉटस्अॅपवर पेपर व्हायरल झाल्याची माहिती मिळताच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी ए. बी. गरुड यांच्या पथकाने आष्टी येथील परीक्षा केंद्रांना भेट दिल्या. सायंकाळी उशिरापर्यंत पेपर व्हायरल कोणी केला ? पर्यवेक्षक कोण होते यासह इतर बाबींची माहिती केंद्रप्रमुखांकडून घेतली जात होती. दरम्यान, आष्टी येथील परीक्षा केंद्राची पाहणी केली आहे. पाहणीचा अहवाल वरिष्ठांना दिल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी ए. बी. गरूड यांनी दिली आहे.अज्ञाताविरूध्द गुन्हाया प्रकरणात केंद्रप्रमुख सुरेश रगडे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.रगडे यांच्या तक्रारीवरून भूमिती विषयाचा पेपर फोडणा-याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूमितीचा पेपर व्हॉट्सअॅपवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:22 AM