राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा, राज्य आणि देशात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. आपापसातील मतभेद आणि दुरावलेली मने पुन्हा जुळविण्यासाठी काँग्रेसने ‘गेट टूगेदर’ द्वारे पक्षात नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाला अधिक सक्षम करुन आगामी काळात याचे चांगले परिणाम दिसून येतील, असा दावा काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिका-यांनी केला आहे.मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजप, शिवसेनेची सरशी झाली आणि राज्यासह देशात सत्ता स्थापन करण्यात आली. या सत्तेत जिल्ह्याला महत्त्वाचा वाटा देण्यात आलेला आहे. एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद अशी शासकीय आणि राजकीयदृष्ट्या वजनदार पदे जिल्ह्याला लाभली आहेत. त्यातच गत तीन वर्षांपासून जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरु असून, शेकडो कोटी रुपये खर्चांची कामे केली जात आहेत. तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षात नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी, अशी अवस्था झाली आहे. आपल्याला डावलले जात असल्याची ज्येष्ठ पदाधिका-यांची भावना होत आहे. तर तरुणांना संधी दिली जात नसल्याने त्यांच्यात मरगळ आली आहे. एके काळी जिल्ह्यात सर्वात प्रबळ पक्ष असलेल्या काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. विविध विषयांवर आंदोलन छेडून सत्ताधाºयांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष मागे असल्याचे दिसून येत आहे. हे चित्र बदलण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी पुढाकार घेत हुरडा पार्टीच्या निमित्ताने घेतलेल्या ‘गेट टूगेदर’ कार्यक्रमात ज्येष्ठ आणि तरुण पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांना एकत्र आणले. जिल्ह्यात काँग्रेस पक्ष उभारणीत आणि जनमाणसात पक्षाचे स्थान निर्माण करण्यात भरीव योगदान देणारे ज्येष्ठ नेते फुलचंद भक्कड, माजी मंत्री शंकरराव राख, रामप्रसाद कुलवंत, माजी आ. संतोषराव दसपुते, बाबूराव कुलकर्णी, ज्ञानेश्वर भांदरगे, नवाब डांगे, आर.आर. खडके, ज्ञानदेव पायगव्हाणे यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी ज्यांनी काँग्रेस उभारणी आपले मोलाचे योगदान दिले आहे. अशी सर्वांनी या गेट टूगेदर कार्यक्रमास उपस्थिती लावली आणि आपली मने मोकळी केली. तसेच चर्चा करुन पुढील पक्ष कार्याची दिशा बोलून दाखविली. तर जिल्ह्यात महिला आघाडीसह अल्पसंख्याक व इतर विविध सेलच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या, युवक काँग्रेसच्या शाखा , वॉर्ड कमिट्या स्थापन करून पक्ष अधिक सक्षम केला जाणार आहे. यादृष्टिने आगामी दिवसांत दर महिन्याला जिल्हा कमिटीची प्रत्येकी एका तालुक्यात बैठक घेतली जाईल. यात जुन्या जाणत्या नेत्यांना विश्वासात घेऊन नवीन कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.
काँग्रेसचे ‘गेट टूगेदर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:49 AM