भोकरदन: आरक्षणासाठी मराठा समाजाच्या रंनरागिनींनी एल्गार पुकारला असून आज सकाळी वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पोस्ट ऑफिसपर्यन्त मोर्चा काढण्यात आला. तसेच आंदोलक महिलांनी आरक्षणासाठी कोणतीच भूमिका न घेणाऱ्या मराठवाड्यातील मराठा समाजाच्या सर्वपक्षीय 32 आमदार आणि 5 खासदारांना साडीचोळी- बांगड्यांचा आहेर स्पीडपोस्टने पाठवत संताप व्यक्त केला.
अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे बेमुदार उपोषण सुरू आहे.त्यांच्या उपोषणला पाठींबा देण्यासाठी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या महिला एकवटल्या आहेत. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्र येऊन महिलांनी पोस्ट ऑफिसपर्यंत मोर्चा काढला. सर्वच राजकीय पक्षातील मराठा समाजाचे आमदार व खासदार काही ठोस भूमिका घेत नसल्याचा संताप आंदोलक महिलांनी व्यक्त केला. तसेच महिलांसारखे धेर्य व शक्ती मिळो यासाठी सर्व मराठा लोकप्रतिनिधींना साडीचोळी- बांगड्यांचा आहेर आंदोलक महिलांनी स्पीडपोस्टने पाठवला.