भोकरदन (जालना ) : तालुक्यातील पारध खुर्द येथील ९ वर्षीय मुलीचा डेंग्यू सदृश्य तापाने मंगळवारी रात्री मृत्यू झाला. औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात येत होते.
पारध खुर्द येथे ग्रामपंचायतच्या दुर्लक्षितपणामुळे गावात कमालीची घाण साचलेली आहे. गावाच्या चारी दिशेने आजही हागणदारी आहे. याबाबत लोकमत ने सतत सचित्र वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा देखील केला. मात्र, झोपी गेलेला आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन जागे झाले नाही. यामुळे गावात रोगराई वाढली आहे.
येथील जिल्हा परिषद शाळेतील पूजा संजय लक्कस(९) हिला मागील पाच सहा दिवसांपासून थंडी-ताप व डोके दुखीचा त्रास होता. तिला स्थानिक दवाखान्यासह भोकरदन येथील खाजगी दवाखान्यात उपचार देखील घेतले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने तिला सोमवारी (दि.१७) औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरु असताना तिचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला.
पूजावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या मृत्यूला ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच तिच्यावर उपचार करणारे डॉ.संतोष रुद्रवार यांनी तिचा डेंग्यूची लागण झाल्याचे लक्षण दिसून येत होती असे स्पष्ट केले.