- फकिरा देशमुखभोकरदन: शहरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या आई व भावानेच तीन वेळा बालविवाह करून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चौथ्या वेळेस विवाह लावून देण्याची तयारी सुरु असताना मुलीने पोलीस ठाणे गाठल्याने नात्याला काळिमा असलेला हा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून आई, दोन भाऊ, तीन पतीसह बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, शहरातील म्हाडा परिसरात एक महिला दोन मुले आणि एका अल्पवयीन मुलीसोबत राहते. अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या आई आणि भावांनी शेंदूरणी येथील एका मुलाशी (ता. जामनेर जिल्हा जळगाव) पैसे घेऊन लावून दिला. एक महिन्यांनी मुलगी परत माहेरी आली. त्यानंतर काही दिवसांनी पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील एकासोबत दुसरा विवाह लावण्यात आला. येथे तीन ते चार दिवस राहिल्यानंतर तिला परत भोकरदनला आणून शहरातील एकासोबत तिसरा विवाह लावला. त्याच्यासोबत पीडिता १ वर्ष औरंगाबाद येथे राहिली. यावेळी त्यांच्यात शारीरिक संबंध आले. मात्र, वाद झाल्याने पीडिता चार महिन्यांपूर्वी पुन्हा माहेरी म्हाडा परिसरात आली.
दरम्यान, 3 डिसेंबर रोजी आई व भावांनी चौथे लग्न लावून देण्यासाठी जळगावकडील पाहुणे येणार असल्याचे सांगितले. पिडीता लग्नास तयार होत नसल्याने भावांनी मारहाण केली. जीवाला धोका असल्याने तिने चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क केला. यानंतर पोलिसांनी तिची भेट घून चौकशी केली. तिच्या तक्रारीवरून आई, दोन भाऊ, तीन पतीसह १२ नातेवाईकांवर 3 डिसेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, सपोनि रत्नदीप जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजाराम तडवी, महिला पोलिस कर्मचारी संगीता मोकाशे, अनिता दाभाडे हे करीत आहेत.
ती खरी आई नाही ?धक्कादायक म्हणजे, सदर अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, मला आईवडील कोण आहेत हे माहीत नाही. सध्या ज्यांच्याकडे राहते त्या लहानपणापासून सांभाळतात. मी त्यांना आई मानते. यामुळे पिडीतेचे खरे आईवडील कोण ? याचा तपास लावणे देखील पोलिसांसमोर आव्हान आहे.