- पवन पवारवडीगोद्री: येत्या ३० सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, पिकविमा, नुकसान भरपाई दिली नाही तर मतदान करून परिवर्तन करा सर्वांचे प्रश्न सुटतील असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केले. तसेच नवीन स्कीम काढण्याचं काय नाटक करतात, लोकांना नादी लावण्यापेक्षा चांगल्या सुविधा द्या, त्या आयुष्यभर पुरतील अशी टीका जरांगे यांनी राज्य सरकारवर केली. अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी आज प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला.
जरांगे पुढे म्हणाले, मराठ्यांनी दलित, मुस्लिमांनी , गोरगरीब,ओबीसी आणि शेतकऱ्यांनी मनात आणलं तर शेतकरी कर्जमुक्तीच आंदोलनच मताच्या रूपात बदलेल. त्यानंतर परिवर्तन अटळ आहे. यातूनच गरिबांचे प्रश्न संपणार असा दावा जरांगे यांनी केला. तसेच प्रत्येक वेळी सांगायचं कर्जमाफी देतो, अनुदान देतो, मालाला भाव देतो मात्र, द्यायचे तर काहीच नाही, अशी टीका देखील जरांगे यांनी केली.
शासनाच्या योजनांवरून सरकारवर निशाणादिवाळीनिमित्त शासन देत असलेल्या आनंदाच्या शिधा योजनेवर बोलत जरांगे यांनी शासनाच्या विविध योजनांवर निशाणा साधला. अर्धा गॅस संपला तरी शिधा मधील तेल वितळत नाही. गोरगरिबांची कामे करा, साड्या, आनंदाचा शिधा देता कशाला? असा सवाल जरांगे यांनी केला. लाडकी बहीण योजना देवेंद्र फडणवीस यांनीच आणली असेल. ही सगळी शाळा त्यांचीच असून योग्य वेळी त्यांनी स्कीम आणली. लाडक्या बहिणीला दिलेले पैसे आमचेच आहेत, तुम्ही काय तुमचं शेत, घर विकलं नाही, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे घर विकून योजनेला पैसे दिले असं ऐकलं नाही. मालाला भाव द्या, शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. लाडकी बहिण चांगली, पण लाडका भाचा आरक्षण मिळत नाही म्हणून मारत आहे, मेहुण्याच्या मालाला भाव नाही, अशी खरमरीत टीका जरांगे यांनी सरकारवर केली. तसेच निवडणुकीत कोणाच्या पैशाला हात लावू नका. तुमच्या लेकरांचे आणि शेतकऱ्यांचे वाटोळ होईल. ते पैसे आयुष्यभर पुरणार नाहीत, असे आवाहन देखील जरांगे यांनी मतदारांना केले.