लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोना काळानंतर जाहीर होणारा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागून होत्या. त्यानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक बाबींना केंद्रित ठेवून आरोग्य, शेती, शिक्षण यांना भरपूर निधी देऊ केला आहे. परंतु, हा जाहीर झालेला निधी प्रत्यक्षात आल्यासच या अर्थसंकल्पाचा संकल्प सिद्धीला जाईल.
देश आणि ग्रामीण भागाचा विचार केल्यास आरोग्यासाठी ६४ हजार कोटी रुपये देऊ केले असून, त्यात कोरोना लसीकरणासाठी ३० हजार कोटींची तरतूद आहे. आत्मनिर्भर भारत या अभियानासाठी अर्थसंकल्पाच्या १३ टक्के तरतूद उल्लेखनीय म्हणावी लागेल. रेल्वेसाठी ९ लाख १० हजार कोटी रुपये ठेवले आहेत, तर देशात नवीन शंभर सैनिकी शाळा आणि आदिवासी भागात एकलव्य शाळांचा समावेश करण्यात आला आहे. करदात्यांसाठी मात्र, सर्वत्र निराशा आहे.
आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी तरतुदी भरपूर आहेत. परंतु, ज्या काही चैनीच्या वस्तू आहेत, त्यांची किंमत वाढविली आहे. त्यात फ्रीजसह अन्य वस्तूंचा समावेश आहे.
वंदना नायगव्हाणकर, गृहिणी
या बजेटमध्ये किराणा वस्तूंसंदर्भात कुठलाच ठोस निर्णय नाही. पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार लावण्यात येणार असल्याने महागाई वाढेल, त्यामुळे ग्राहकांचे नुकसान आहे.
सुनील पांगारकर, किराणा दुकानदार
आजच्या बजेटमध्ये करदात्यांसाठी कुठल्याच सवलती देण्यात न आल्याने सर्वत्र नाराजी आहे. त्यामुळे हे बजेट म्हणजे नोकरदारांची निराशा करणारेच म्हणावे लागेल.
कृष्णा कुंभेफळकर, खासगी नोकरदार
युवकांसाठी या अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत योजनेतून नवीन उद्योग सुरू करण्यासाठी चांगल्या योजना जाहीर केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. निखिल जोशी, युवक बजेटमध्ये व्यापाऱ्यांसाठी विशेष पॅकेज मिळेल, अशी आशा होती. मात्र, ती पूर्ण झाली नाही, असे असतानाच लोकल फॉर व्होकलसाठीची तरतूद प्राेत्साहन देणारी आहे.
सतीश पंच, व्यापारी
बजेटमध्ये पेट्रोलची दरवाढ कमी होण्यासाठी कुठलीही तरतूद केलेली नाही, त्यामुळे प्रवाशांना अधिकचे पैसे मोजूनच रिक्षाने प्रवास करण्याची वेळ येणार आहे. याचा विचार होणे अपेक्षित होते.
रहीम तांबोळी, ऑटोचालक
कृषी क्षेत्रातील सिंचनासाठी ५ हजार कोटी रुपये ठेवले आहेत. परंतु, संपूर्ण देशाचा विचार करता, ही रक्कम अत्यंत तोकडी आहे. शेतीसाठी प्रोड्यूसर कंपन्या उभारण्याचे ध्येय निश्चितच चांगले म्हणावे लागेल.
मकरंद कार्ले, शेतकरी
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात आणण्याची कुठलीच चिन्हे सध्या नाहीत, यामुळे सर्वसामान्यांनाच याचा मोठा फटका बसणार असून, महागाईत आणखी वाढ होणार आहे.
संदीप तोतला, पेट्रोलपंप चालक
अर्थसंकल्प म्हणजे काय असतो, हे केवळ दुसऱ्या दिवशी बातम्या आणि अन्य माध्यमातून कळते, त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या व्यक्तींसाठी महागाई वाढली की नाही एवढेच आम्ही पाहतो. फुलचंद माळी, भाजीपाला विक्रेता
बसस्थानक
कोरोनानंतर जाहीर होणाऱ्या बजेटबाबत सर्वांनाच उत्सुकता होती, हे बजेट म्हणजे अनेक नवनवीन घोषणा करणारे ठरेल, याबाबत आधीच विविध माध्यम, समाजमाध्यमांतून ऐकण्यास मिळत होते, त्यानुसार जाहीर झालेल्या बजेटवर करसवलत न देण्यासह कोरोना लसीकरणासाठी केलेल्या तरतुदींबद्दल मात्र बसस्थानक परिसरात प्रवासी समाधान व्यक्त करीत होते.
रेल्वेस्थानक
पूर्वी रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर होत होता; परंतु ही पद्धत मोदी सरकारने बंद केली. त्यामुळे आजच्या बजेटमध्ये रेल्वेसाठी ९ लाख १० हजार कोटींची जी तरतूद केली आहे, त्यातून काय हाती येणार, अशी चर्चा रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांच्यात होत होती.