प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. उच्च शिक्षणही शहरातच झाले. त्यामुळे शेळी-मेंढी यांच्याशी माझा संबंध आला नाही. बीएस्सी. अॅग्री करताना शेतक-याच्या घरी सहा महिने राहावे लागते. कृषी विद्यापीठातील संशोधनाचा वापर शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व्हावा, हा त्यामागचा उद्देश. मला जे गाव मिळाले तिथे लोक मेंढीपालन करायचे. पण, त्यांची पुढची पिढी ते सोडून नोकरीच्या शोधात होती. त्यांची कारणे शोधली तेव्हा सामाजिक अप्रतिष्ठा, हेटाळणीची वागणूक आदी कारणे पाहणीत पुढे आली.नंतर मी अभ्यासक्रम पूर्ण करून एका मोठ्या कंपनीत लाखाच्या पगारावर रुजू झालो; पण आपण खत विकण्यासाठी इतके शिकलो का, असा प्रश्न पडायचा. एक दिवस नोकरी सोडली आणि घरी आलो. नोकरी सोडली, आता शेळीपालन करणार असे सांगितले. त्यांचा विरोध सुरू झाला. मी निर्णयावर ठाम होतो. त्यामुळे त्यांनी गावातील लोकांना माझी समजूत काढायला लावली. ते यायचे, शेळीपालनातील धोके सांगायचे. मी फक्त ते धोके नोंद केले आणि सुरुवातीलाच प्रतिबंधात्मक उपाय केले. शेतकºयांना मला सांगायचे की, अर्ध्याहून अधिक आयुष्य गावात गेलेले असेल तर तुम्हाला शहरात राहताना गुदमरल्यासारखे होते ना? पण ज्यांचा जन्मच तिथे झालाय ते मस्त राहताहेत. बंदिस्त शेळीपालन करताना हीच खबरदारी घ्यायची की, तीच शेळी वा मेंढी बंदिस्त राहू शकते जिचा जन्म तिथे झालेला असतो. शेळी आणि मेंढी शेतकºयाला आर्थिक बळ देणारा महत्त्वाचा घटक आहे. औरंगाबादमधील एका संस्थेने केलेल्या पाहणीत असे आढळून आले की, ज्या घरात एक-दोन शेळ्या-मेंढ्या आहेत, तिथे शेतकरी आत्महत्या झालेली नाही. यामागचे कारण एका महिलेने सांगितले. दोन-चार शेळ्या असतील. आर्थिक चणचण झाली, तर पटकन ती विकता येते. त्यातून आलेल्या पैशांतून एक महिना निघून जातो. शेतकºयांच्या आत्महत्या फार मोठ्या पैशांसाठी होत नाहीत. कधी कधी हजार दोन हजार रुपयांसाठीही शेतकरी गळफास घेतो, अशावेळी एक शेळी शेतकºयाला जीवदान देते. त्यामुळे शेळीपालन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे.(शब्दांकन - विकास व्होरकटे)
एक शेळी शेतकऱ्याचे मरण टाळते..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 12:43 AM