वरूड (बु.) : आज माणसातली माणुसकी हरवून गेली आहे. जो-तो आपला स्वार्थ गुंफण्यात तरबेज आहे. परंतु, जीवन जगत असताना ज्या व्यक्तीची नीतिमत्ता व भावना साफ असते अशा व्यक्तीला परमेश्वर कधीच कमी करीत नाही. अडचणीच्या काळात भरभक्कमपणे त्या व्यक्तीच्या पाठीशी देवदूतासारखा उभा राहत असल्याचे प्रतिपादन हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज यांनी केले.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. आज समाजातील युवकांमध्ये व्यसनाधीनता अधिक प्रमाणात वाढत चालली आहे. दारूचे व्यसन ज्यांना जडले आहे त्यांच्या घरातील पत्नी व लेकराबाळांचे हाल न पाहता येणारे आहेत. यासाठी युवकांनी व्यसनमुक्त जीवन जगणे काळाची गरज आहे. आज बरेच आई-वडील मुलीचा विवाह संबंध जोडताना मुलांचे घरातील संस्कार व आचारण व्यवस्थित न पाहता घरातील संपत्तीकडे पाहून मुलीचे लग्न करतात. परंतु, नंतर त्या लेकराला सासरी हिंस्र वागणूक मिळते. अशा अनेक घटना समाजात पाहावयास मिळत असल्याचेदेखील ज्ञानेश्वर माउली महाराज यांनी सांगितले. या वेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संकटांचा सामना खंबीरपणे करा
निसर्गाची अवकृपा ही दरवर्षी शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे जगाचा पोशिंदा कर्जबाजारी होत आहे. अशातच नैराश्य येऊन तो आत्महत्या करू लागला आहे. शेतकऱ्यांनी खंबीरपणे संकटाचा सामना करणे गरजेचे आहे. कारण आलेले खराब दिवस निघून जात असतात याचा विचार प्रत्येकाने मनात रुजविणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
फोटो