लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : येथील माजी जिल्हा परिषद सदस्य शाम वसंतराव उढाण यांच्या घरातील तिजोरीतील तब्बल ८ लाख ११ हजार रूपये किंमतीचे ४० तोळे सोन्याची चोरी झाली. ही घटना मागील दोन महिन्यांच्या कालावधीत घडली असून, या प्रकरणी बुधवारी दुपारी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.कुंभार पिंपळगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य शाम उढाण यांनी त्यांच्या घरातील तिजोरीतील सोने गत दोन महिन्यांपूर्वी पाहिले होते. मागील दोन महिन्यांच्या दरम्यान त्यांनी ते सोने पाहिले नव्हते. मात्र, दोन दिवसांपूर्वी घरातील तिजोरी उघडून पाहिली असता आतील ८ लाख ११ हजार रूपये किमतीचे तब्बल ४० तोळे सोने चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी शाम उढाण यांच्या फिर्यादीवरून दोन संशयितांविरुध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सी.डी शेवगण, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक सचिन कापुरे हे करीत आहेत.
४० तोळे सोने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:58 AM