जालना : कोरोनामुळे कोलमडलेल्या लाल परीला मालवाहतूक वरदान ठरत आहे. आजवर माल वाहतुकीतून जालना विभागाला ४२ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
कोरोनामुळे एसटी मध्यंतरी तोट्यात आली होती. चालक- वाहकांचा पगार करण्याचा मोठा प्रश्न महामंडळासमोर पडला होता. यावर मार्ग शोधण्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने माल वाहतूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानुसार २१ मे पासून जिल्ह्यातून माल वाहतूक केली जात आहे. सर्वप्रथम दोन बसचे ट्रकमध्ये रूपांतर करण्यात आले होते. यानंतर माल वाहतूकीला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली. आजरोजी जालना विभागातून २३ बस कोल्हापूर, सातारा, सोलापूर, धर्माबाद, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, वाशिम, परभणी, खामगाव आदी ठिकाणी अल्पदरात वाहतूक करीत आहेत.
२१ मे पासून आजवर जिल्ह्यातून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांची एक लाख ४१ किलोमिटरपर्यंत रनिंग झाली आहे. यातून महामंडळाला ४२ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. शिवाय माल वाहतूक अगदी कमी दरात सुरक्षितरीत्या केली जात आहे. त्यामुळे माल वाहतूकीला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे मागील एकाच महिन्यात जालना आगाराला सात लाख ७१ हजार रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असून, सध्याही आगारातून लातूर, बीड, यवतमाळ, अमरावती या ठिकाणी वाहतूक केली जात आहे. बसमधून केली जाणारी वाहतूक विश्वासू आहे, सदर वाहतूकीचा ग्राहकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन जालना आगार प्रमुख पंडित चव्हाण यांनी केले आहे.
प्रवाशांसाठी ११० बस सुरू सध्या प्रवाशांसाठी जालना, जाफराबाद, परतूर व अंबड या आगारातून एकूण ११० बस धावत आहेत. यातील अनेक बस लांबच्या मार्गावर सोडण्यात आलेल्या आहेत. तर यापुढे ग्रामीण भागातून मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बस सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय कार्यालयातून देण्यात आली.
पार्सलची सुविधा
आजवर एसटीच्या मालवाहतूकीद्वारे पोलाद, औषधी, बियाणे यांसह इतर साहित्यांची वाहतूक केली जात होती. परंतु, येत्या काही दिवसांमध्ये छोट्या व्यावसायिकांसाठी पार्सलसह कुरियरची वाहतूक करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद नेव्हूल यांनी दिली.