गणरायाला उत्साहात निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:01 AM2018-09-25T01:01:11+5:302018-09-25T01:01:41+5:30
जालना शहरात मुख्य मिरवणुकीस रविवारी रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरात मुख्य मिरवणुकीस रविवारी रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. डीजे बंदीमुळे यावेळी हा गणेश उत्सव संस्मरणीय ठरला. पारंपरिक ढोल मंडळ तसेच वाजंत्री आणि बँड पथकाला मोठी मागणी दिसून आली. अनेक मंडळांच्या लेझीम पथकाने लयबध्द सादरीकरण करून जालनेकरांची मने जिंकली. यावेळी काही ठिकाणी बंदी असलेले गाणे वाजविल्यावरून मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बराच वाद झाला.
मानाच्या गणपतीची पूजा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी. आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य,यांच्यासह गणेश महासंघाचे अध्यक्ष अग्रवाल, विनित साहनी, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, महावीर ढक्का, मेघराज चौधरी, पारस नंद, नागेश बेनिवाल यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या..., गणपती चालले गावाला...चैन..पडेना भक्तांना अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मुख्य मिरवणुकीत जवळपास ६२ गाड्या सहभागी झाल्या होत्या. रात्री आठ वाजता सुरू झालेली ही मिरवणूक सकाळी पाच वाजेपर्यंत चालली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुलालांची उधळण आणि ढोल ताशाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. या ढोल पथकात महिला आणि युवतींचाही मोठा सहभाग दिसून आला.
नवीन जालना भागाप्रमाणेच जुन्या जालन्यातही अनेक लहानमोठ्या गणेश मंडळांनी सकाळपासूनच वाजतगाजत मिरवणूक काढली होती. मोती तलावा जवळ एन.के. फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक गणेश मंडळांना तसेच घरगुती गणेश भक्तांकडून गणपती दत्तक घेतले. तसेच कृत्रिम हौदात गणपतीचे विसर्जन करण्याची विनंती केल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष खरात यांनी दिली.
कादराबादेत किरकोळ कारणातून वाद...
कादराबाद परिसरात मुख्य मिरवणूक रात्री १ वाजेच्या दरम्यान आली होती. यावेळी दहीहंडी फोडण्यावरून दोन गटात वाद झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. नंतर दोन गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत.
जुन्या जालन्यातून मोती तलावात गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. या मार्गावरून भविष्यात केवळ एकेरी वाहतूक करणे गरजेचेचे झाले आहे. मोती तलावात विसर्जनाच्यावेळी झालेल्या दुर्घटने नंतर रूग्णवाहिकांना जाण्यासही अडचण आली होती. परंतु गणेश भक्तांनी समयसूचकता दाखवत रूग्णवाहिका जात असताना ढोलताशा बंद ठेवून तातडीने बाजूला होत, मार्ग रिकामा केला होता. परंतु पुढच्या वर्षी या मार्गावरून केवळ एकेरी वाहतूक व्यवस्था करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली.