जालना : जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे शालेय पोषण आहारासह गरोदर महिला, स्तनदा माता यांना घरपोच कोरडा पोषण आहार शासनाच्या निकषानुसार पुरविला जात असल्याचे सांगण्यात आले.
शालेय पोषण आहाराप्रमाणेच जिल्ह्यातील गरोदर महिला, स्तनदा माता यांना कुपोषणाचा फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारच्या वतीने पोषण आहार वितरित केला जातो. या पोषण आहाराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे हे हेाते. शाळेतच भोजन मिळत असल्यास अनेकजण आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार होत असल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
जालना जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचे वितरण हे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून केले जाते. या अंतर्गत तांदूळ, गहू, डाळ आणि फोडणी देण्यासाठी तेलाचे पाकीट मिळते परंतु कोरोनापूर्वी संबंधित लाभार्थ्यांना शिजवून शाळेमध्ये वाटप केले जात होते.
काय-काय मिळते
केंद्र सरकारकडून कुपोषण निर्मूलनासाठी विशेष पुढाकार घेतला जात आहे. त्यानुसार आहार तज्ज्ञांच्या सूचनेनुसार कुठला पोषण आहार देण्याचे ठरते.
कुपोषण निर्मूलनासाठी विशेष करुन जीवनसत्त्व वाढविण्यावर भर दिला जातो. त्यात प्रोटीन तसेच सी आणि जीवनसत्त्व बी यांना प्राधान्य दिले जाते.
आहार अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तांदूळ, गहू, तसेच साखर याचाही समावेश असतो. सकस आहार देण्याचा उद्देश या योजनेचा आहे.
कोरोना काळातही पुरवठा सुरळीत
शालेय तसेच गरोदर आणि स्तनदा मातांना पोषण आहाराचे वाटप सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याचे चांगले परिणाम देखील समोर आले आहेत. पोषण आहारामुळे शालेय विद्यार्थ्याची उपस्थिती वाढली असून पोषण आहारामुळे गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पोषण आहार मिळत असल्याने त्यांच्या आरोग्यात सकारात्मक बदल झाला असल्याचे दिसून येत आहे.
- संगीता लोंढे, उपमुख्य अधिकारी
फोडणी कशी द्यायची
गरोदर आणि स्तनदा मातांसाठी देखील केंद्र सरकार पोषण आहार देत आहे. त्याचा मोठा लाभ या महिलांना होत असून कोरोना काळातही घरपोच पुरवठा केला जात असल्याने मदत होत आहे.
- आशामती तांदळे, सामनगाव
आज ग्रामीण भागामध्ये अनेक कुटुंब हे मोलमजुरी करुन उपजीविका भागवितात. त्यामुळे घरात गरोदर महिला असतानाही तिला योग्य तो आहार दिला जात नाही. या उपक्रमाचा मोठा लाभ झाला आहे.
- भागूबाई पाटील, पारडगाव
शालेय पोषण आहार उपलब्ध होत असल्याने मुलांना शाळेची गोडी लागली आहे, परंतु शाळा बंद असतानाही हे पोषण आहाराचे किट घरपोच मिळत असल्याने त्याचा मोठा लाभ गोरगरिबांना होत आहे.
- विठ्ठल ढगे, दरेगाव