लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत राज्यशासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने कै. यशवंतराव सभागृहात गुरुवारी आयोजित आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा आरोरा, महिला व बालकल्याण सभापती सुमन घुगे, महिला व बालकल्याण अधिकारी संगीता लोंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती. राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका बालकांच्या चांगल्या आरोग्यासाठी सातत्याने काम करतात. गाव पातळीवर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका, मदतणीस यांची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर वैयक्तिक पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. जिल्हा परिषद अध्यक्ष खोतकर, उपाध्यक्ष टोपे, मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांनी आपल्या भाषणात अंगणवाडी सेविकांच्या कार्याचे कौतुक करत, त्यांना चांगल्या सेवा पुरविण्याची ग्वाही दिली. महिला बालकल्याण अधिकारी लोंढे यांनी प्रस्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. एस. यू. अंभोरे यांनी सूत्रसंचालन केले तर एस. टी. सुखदेवे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव, अरुणा शिंदे, अनिता राठोड, सभापती पांडुरंग डोंगरे, पंडित भुतेकर, उफाड, शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी महिला व बालकल्याण विभागाचे लहाने, गलधर, खाडे, नुग्रावार, रमाकात वाघमारे, सालारी, वीर, पाटील यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमात २४ केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्र, १२ आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, १२ आदर्श अंगणवाडी सेविका, १२ आदर्श अंगणवाडी मतदनीस पुरस्कारांचे मान्यवांच्या हस्ते वितरण करण्यात आले. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानात विभागीय रांगोळी स्पर्धेत प्रथम पाच हजार रुपयांचा पुरस्कार पूनम अशोक कंडारकर यांना राज्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. कुस्तीपटू प्रिया प्रतापसिंग घुसिंगे हीचा यावेळी सत्कार करण्यात आला. बेटी बचाओ अभियानात विशेष कार्य करणारे महिला व बालकल्याण विभागाचे एम.आर.खतीब यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.